मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhuri Pawar: ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे निधन

Madhuri Pawar: ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; ‘या’ जवळच्या व्यक्तीचे निधन

Harshada Bhirvandekar HT Marathi
Oct 12, 2023 03:01 PM IST

Madhuri Pawar Brother Passed Away: अभिनेत्री माधुरी पवार हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या भावाचे निधन झाले आहे.

Madhuri Pawar
Madhuri Pawar

Madhuri Pawar Brother Passed Away: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील ‘वहिनीसाहेब’ अर्थात अभिनेत्री माधुरी पवार हिच्यावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्रीच्या भावाचे निधन झाले आहे. शोकाकुल माधुरीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ही दुःखद बातमी चाहत्यांना सांगितली आहे. अनेकदा माधुरीसोबत तिचा भाऊ देखील सावलीप्रमाणे तिची कामं सांभाळताना दिसायचा. तिच्या भावाच्या अक्षयच्या निधनाला आता १२ दिवस उलटून गेले आहेत. १२ दिवसांनी तिने ही भावूक पोस्ट लिहिली आहे. चाहते देखील कमेंट करत माधुरी पवार हिला सांत्वना देत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेत्री माधुरी पवार हिने इन्स्टाग्रमवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले की, ‘प्रिय अक्षय, तुला जाऊन बारा दिवस झाले... हे शब्दात व्यक्त करायची वेळ आली यासारखं दुर्दैव नाही... नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे कुणी सांगू शकत नाही... उद्याचा दिवस कोणी पाहिलाय असं बऱ्याचदा आपण बोलतो... खरंय... उद्याचा दिवस पाहता आला असता तर मी माझ्या आयुष्यात माझ्या भावाच्या बाबतीत अचानकपणे घडलेली दुखद घटना घडण्यापासून मी थांबवू शकली असती... तुझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना की, तू नाहीस ही कल्पनाच सहन होत नाहीए. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीत तुझी साथ होती, मग माझे इव्हेंट्स असो किंवा काही, तू माझ्याबरोबर असायचास, बऱ्याचवेळा माझ्या वतीने, माझ्या अनुपस्थितीत आपलं घर सांभाळलंस, घरच्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस. मला तुझा खूप आधार वाटायचा. स्वयंपाकाची आवड असल्यामुळे आपलं हॉटेल सुरू करायचं तुझं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं होतं ना. तू कोणालाही कधी ‘नाही’ असं बोलला नाहीस, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उभा राहिलास, कुठल्याही कामाला कमी लेखलं नाहीस, कुटुंबासाठी, मित्रांसाठी सदैव उभा राहिलास, आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर तू आपलेपणाचं नातं तयार केलं होतंस. कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाहीस, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सतत झगडत राहिलास. कायम स्वतःपेक्षा बहिणींच्या कामाला प्रथम प्राधान्य दिलंस, या तुझ्यातील सर्व गुणांचा मला अभिमान होता आणि कायम असेल.’

Shivrayancha Chhava: टाईम्स स्क्वेअरवर पोस्टर झळकणारा पहिला मराठी चित्रपट; ‘शिवरायांचा छावा’ने इतिहास रचला!

पुढे माधुरीने लिहिले की, ‘तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामुळे मला काम करण्यासाठी वेगळी उर्जा मिळायची. बहिणींच्या प्रेमापोटी तुला भाऊ म्हणून जे-जे करणं शक्य होतं ते-ते तू केलंस. आई-बाबांचे संस्कार आणि आमच्या दोघांमधला समजूतदारपणा यामुळे आमच्यात कधी भांडणं झालीच नाहीत. तू माझा लाडका होतास आणि कायम राहशील. गेली अनेक वर्ष रक्षाबंधन आणि भाऊबीज आपण उत्साहात साजरी करायचो, यंदाचे रक्षाबंधनाचे तुझ्यासोबतचे क्षण आठवत आहेत, पण येत्या दिवाळीतील भाऊबीज आठवून जास्त त्रास होतोय... एका सावलीसारखा माझ्यासोबत असायचा, पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ? माझा नेहमी अट्टहास असायचा की अक्षय तुला जे काही पाहिजे ते जगाकडे मागण्याऐवजी माझ्याकडे माग. आजही तुला खूप काही द्यावसं वाटतंय, तुझ्या इच्छा पूर्ण कराव्याशा वाटत आहेत आणि ते मी नक्की करेन.’

भावाच्या आठवणीत व्याकूळ होत माधुरीने लिहिले की, ‘मी नक्कीच गेल्या जन्मी पुण्य केलं असणार म्हणून या जन्मी मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला. पण, तुझ्यासोबत आयुष्य अजून जास्त जगायला नक्कीच आनंद झाला असता... जिथे कुठे असशील तिथे देखील सगळ्यांना हसत खेळत ठेवशील याची मला खात्री आहे. माझ्या करियरमध्ये तुझा सर्वात जास्त मोलाचा वाटा होता, मला एका मोठ्या उंचीवर तुला पाहायचं होतं, तुझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नक्की अजून मेहनत घेईन आणि कामाची जोमाने सुरुवात करेन. तुझी साथ, तुझं प्रेम, तुझा पाठिंबा माझ्या पाठीशी तसाच कायम ठेव! पण तुझी उणीव माझ्या मनात आणि आयुष्यात कायम राहणार अक्षू.’

IPL_Entry_Point

विभाग