मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Akshay Kumar : अक्षय कुमार पोहोचला 'शिवतीर्थ'वर! या भेटीमागचे ‘राज’ काय?

Akshay Kumar : अक्षय कुमार पोहोचला 'शिवतीर्थ'वर! या भेटीमागचे ‘राज’ काय?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 04, 2022 03:53 PM IST

Akshay Kumar Meets Raj Thackeray: बॉलिवूडमधील सध्याचा आघाडीचा आणि सर्वात बिझी अभिनेता असलेल्या अक्षय कुमारनं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.

Akshay Kumar meets Raj Thackeray
Akshay Kumar meets Raj Thackeray

Akshay Kumar meets Raj Thackeray : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यानं आज 'शिवतीर्थ' निवासस्थानी जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. अक्षयनं अचानक घेतलेल्या या भेटीमुळं साहजिकच चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, ही भेट पडद्यामागच्या राजकारणाशी संबंधित नसून सिनेमाच्या पडद्याशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून अक्षय कुमार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. नुकतीच या चित्रपटाची घोषणा झाली. याच निमित्ताने अक्षयने E राज ठाकरे यांची भेट घेतली. अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही भूमिका करण्यासाठी आपल्याला राज ठाकरे यांनी प्रोत्साहन दिले, असे म्हणत अक्षयने दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. आता याच भूमिकेसाठी अक्षय थेट राज ठाकरे यांच्याकडून टिप्स घेत असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेता अक्षय कुमार याने आज (४ नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी अर्थात ‘शिवतीर्थ’वर जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीचे फोटो मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत दोघेही हात मिळवताना दिसले. या फोटोवर नेटकरी देखील भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. तर, अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडून टिप्स घेत असल्याचे म्हटले जात आहे.

आपल्याला ही भूमिका कशी मिळाली हे सांगताना अक्षय कुमारने राज ठाकरे यांचे नाव घेतले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळावी हे माझं स्वप्न होतं. पण, ही भूमिका मला मिळण्यामागे एका व्यक्तीचं श्रेय आहे, ते म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरे यांनी मला सांगितलं की, अक्षय तू ही भूमिका करायला हवी, तू करू शकतोस. त्यांच्या आग्रहामुळेच ही भूमिका माझ्या वाट्याला आली’, असे अक्षय कुमार म्हणाला होता. यानंतर आता त्याने राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महाराष्ट्राचा इतिहास प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटात ‘बिग बॉस मराठी’चा विजेता विशाल निकम आणि ‘स्प्लिट्सविला’ विजेता जय दुधाणे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विराट मडके, सत्या मांजरेकर, डॉ. उत्कर्ष शिंदे आणि नवाब शहा हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

IPL_Entry_Point