मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss Winner: बिग बॉस जिंकून स्टार बनले अन् काळाच्या ओघात गायब झाले! पाहा आता काय करतात...

Bigg Boss Winner: बिग बॉस जिंकून स्टार बनले अन् काळाच्या ओघात गायब झाले! पाहा आता काय करतात...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 13, 2023 11:13 AM IST

Bigg Boss Winner: बिग बॉसने मनोरंजन विश्वाला १५ स्टार्स दिले. यातील काही कलाकार आजघडीला मनोरंजन विश्व गाजवत आहेत. तर, काही कलाकार मात्र या संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत…

Bigg Boss Winner
Bigg Boss Winner

Bigg Boss Winner: छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १६’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. महाराष्ट्राचा बहुचर्चित रॅपर एमसी स्टॅन याने यंदाच्या सीझनचे विजेतेपद पटकावले आहे. या आधी देखील ‘बिग बॉस’चे १५ सीझन पार पडले. अर्थात बिग बॉसने मनोरंजन विश्वाला १५ स्टार्स दिले. यातील काही कलाकार आजघडीला मनोरंजन विश्व गाजवत आहेत. तर, काही कलाकार मात्र या संधीचा फायदा घेऊ शकले नाहीत आणि काळाच्या ओघात गायब झाले. अशाच काही विजेत्या कलाकारांबद्दल जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

राहुल रॉय

‘आशिक’ फेम बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय याला ओळखत नाही, असा व्यक्ती क्वचितच असावा. ‘आशिकी’ या चित्रपटाने राहुल रॉयला रातोरात सुपरस्टार बनवले होते. मात्र, या चित्रपटानंतर त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. यानंतर अभिनेता मनोरंजन विश्वापासून दुरावला होता. मात्र, ‘बिग बॉस’च्या पहिल्याच सीझनमध्ये त्याला पुन्हा एकदा चमकण्याची संधी मिळाली. या सीझनचं विजेत पद देखील त्याने पटकावलं. मात्र, स्टार बनून देखील त्याला नंतरही फारशा भूमिका मिळाल्या नाहीत.

आशुतोष कौशिक

‘बिग बॉस २’चा विजेता आशुतोष कौशिक मात्र काळाच्या ओघात एकदम गायब झाला. अनेकांना हे नाव आता फारसे परिचित देखील नसेल. आशुतोषने आपल्या दमदार खेळीने बिग बॉसच्या घरात आपले वर्चस्व निर्माण केले होते. या शोचा विजेता बनल्यानंतर आशुतोषला काही चित्रपट मिळाले. मात्र, याचा त्याच्या कारकिर्दीला फारसा फायदा झाला नाही.

विंदू दारा सिंह

बॉलिवूड अभिनेते दारा सिंह यांचा मुलगा विंदू दारा सिंह देखील ‘बिग बॉस’मध्ये झळकला आहे. ‘बिग बॉस’च्या तिसऱ्या सीझनचा विनर ठरलेल्या विंदूने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. ‘बिग बॉस’मध्ये येण्याआधीच विंदू दारा सिंह मनोरंजन विश्वात सक्रिय होता. मात्र, ‘बिग बॉस ३’ जिंकण्याचा फायदा त्याला झाला नाही. आजघडीला देखील तो छोट्या-छोट्या भूमिका करत आहे.

जुही परमार

‘कुमकुम’ या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री जुही परमार घराघरांत प्रसिद्ध झाली होती. यानंतर जुही ‘बिग बॉस ५’मध्ये देखील सहभागी झाली होती. आपल्या दमदार खेळाने तिने ‘बिग बॉस ५’ हा सीझन जिंकला होता. मात्र, या शोच्या विजयाचा तिच्या कारकीर्दीला फायदा झाला नाही. यानंतर ती काही शोचे सूत्रसंचालन करताना दिसली. मात्र, सध्या तिच्या हातात काही नवे प्रोजेक्ट्स नाहीत.

मनवीर गुर्जर

बिग बॉसमधून प्रचंड लोकप्रियता मिळवून देखील गायब झालेल्या कलाकारांपैकी एक नाव आहे मनवीर गुर्जर. ‘बिग बॉस १०’ हे सीझन जिंकून लोकप्रिय ठरलेला मनवीर या शोनंतर मनोरंजन विश्वातून पूर्णपणे दूर झाला. आजही त्याने झगमगाटी विश्वापासून स्वतःला दूरच ठेवले आहे.

IPL_Entry_Point