Bigg Boss 17 Latest Update: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस १७' आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मागील प्रत्येक सीझन प्रमाणेच यावेळीही धमाके पाहायला मिळणार आहेत. यावेळी शोची थीम कपल्सवर आधारित असणार आहे. याशिवाय अनेक प्रसिद्ध युट्युबर्स आणि कंटेंट क्रिएटर्स देखील या शोमध्ये सहभागी होताना दिसले आहेत. मात्र, बिग बॉसच्या घरातील पहिलाच दिवस स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठी खूपच मनोरंजक ठरला आहे. पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये घरातील रूम्सवरून जोरदार भांडण झाले.
'बिग बॉस १७' या शोचा पहिला प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे, ज्यामध्ये पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये भांडण झाल्याचे पाहायला मिळत आहे. स्पर्धकांमधील हे भांडण इतके वाढले की, थेट हाणामारीपर्यंत पोहोचले होते. दरम्यान, बिग बॉसमध्ये अंकिता लोखंडेचा पती विकी जैन याचे ही वाद झाले आहेत.
'बिग बॉस १७'च्या सध्या सुरू असलेल्या प्रोमोची सुरुवात ईशा मालवीय आणि अभिषेक कुमार यांच्यातील शाब्दिक युद्धाने होते, ज्यानंतर स्पर्धकही गोंधुळून जातात आणि नंतर चर्चा करतात. त्यानंतर पुन्हा एकदा सर्व स्पर्धकांमध्ये घराबाबत जोरदार भांडण सुरू होते. याचवेळी युट्युबर अरुण श्रीकांत मशेट्टी याचा अभिषेकसोबत घर क्रमांक ३साठी वाद सुरू झाला आणि त्यांचं हे भांडण हाणामारीपर्यंत पोहोचलं आहे.
अरुण श्रीकांत मशेट्टी आणि अभिषेक यांच्याशिवाय घर क्रमांक ३साठी अर्थात 'दम'साठी सनी आर्या उर्फ 'तहलका भाई' सोबत चुरशीची लढत असणार आहे. आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आज रात्री 'बिग बॉस १७'चा नवा एपिसोड पाहावा लागणार आहे. 'बिग बॉस सीझन १७'मध्ये एकूण १७ स्पर्धकांनी एंट्री घेतली आहे, जे १०५ दिवस 'बिग बॉस'च्या घरात कैद होणार आहेत.