Akshay Waghmare Weight Gain: आपली भूमिका उठावदार दिसावी यासाठी कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. या भूमिका चित्रपटाच्या पडद्यावर जिवंत वाटाव्यात यासाठी पडले तितकी मेहनत कलाकार घेतात. कधी भूमिकेची गरज म्हणून वजन कमी करावे लागते. तर, कधी वजन वाढवावे लागते. दरम्यानच्या काळात अनेकदा हे कलाकार वजनावरून ट्रोल होताना पाहायला मिळतात. नेहमीच प्रत्येक कलाकार फिट रहाण्यासाठी धडपड करताना पहायला मिळतो. भूमिकेला साजेसं दिसण्यासाठी ही कलाकार मंडळी कसून मेहनत घेताना पाहायला मिळतात. ही घेतलेली मेहनत आपण मोठ्या पडद्यावर नेहमीच पाहतो. आता आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता अक्षय वाघमारे हा वजन वाढवताना दिसला आहे.
वजन कमी करण्याबाबत अनेकदा आपण ऐकतो, पण वजन वाढवण्याबाबत क्वचितचं ऐकायला मिळतं. 'डॅडीं'चा जावई अर्थात मराठमोळा अभिनेता अक्षय वाघमारे याने त्याच्या आगामी 'खुर्ची' या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी तब्बल ५ किलो वजन वाढवलं असल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे, तर रावडी अशा भूमिकेला साजेशी शरीरयष्टी त्याने कमावल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षयने घेतलेली ही मेहनत समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे. तब्बल पाच किलो वजन वाढवून 'भूमिकेसाठी काहीपण...' म्हणत अक्षयने पुन्हा एकदा प्रेक्षकांमध्ये छाप पाडली आहे.
'खुर्ची' या चित्रपटात अक्षय वाघमारे अतिशय 'रावडी' भूमिका साकारताना दिसणार आहे. या आगामी चित्रपटातील भूमिकेसाठी अक्षयची मेहनत वाखाणण्याजोगी आहे. याबाबत बोलताना अक्षय म्हणाला की, ‘एखाद्या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेणं हे अर्थात आव्हानात्मक असतं. खुर्ची या माझ्या चित्रपटातील भूमिकेसाठी मी तब्बल ५ किलो वजन वाढवलं, आणि मसल गेन करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. विशेष म्हणजे हे माझ्याकडून करून घेण्यात मला मदत केलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. तुम्ही आजवर खूप प्रेम माझ्यावर केलं आहात नक्कीच तुम्ही माझ्या खुर्ची सिनेमातील भूमिकेवरही तितकंच प्रेम कराल अशी आशा करतो.’
आगामी 'खुर्ची' हा चित्रपट संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत 'आराध्या मोशन फिल्म्स', व 'योग आशा फिल्म्स' निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांचे असून, दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची बाजू उत्तमरीत्या सांभाळली आहे. येत्या १२ जानेवारी २०२४ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या