Salman Khan Security Review by Mumbai Police: गेल्या काही काळापासून सलमान खान याला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या धमक्यांनंतर बॉलिवूडच्या दबंग अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. आता पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीकडून नव्याने धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी मंगळवारी सलमान खानला दिलेल्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेतला. तसेच, पोलिसांनी यावेळी अभिनेता सलमान खान याला अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान याला आधीच वाय-प्लस सुरक्षा दिली आहे.
नुकतीच लॉरेन्स बिश्नोईने फेसबुक पोस्ट लिहीत गिप्पी ग्रेवालच्या कॅनडातील घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती. या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते की, 'तुम्ही सलमान खानला तुमचा भाऊ मानता, पण आता तुमच्या ‘भावा’ने येऊन तुम्हाला वाचवण्याची वेळ आली आहे. हा मेसेज सलमान खानसाठीही आहे - दाऊद तुम्हाला वाचवेल, तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही या भ्रमात राहू नका. सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूवर तुझी ड्रॅमॅटीक प्रतिक्रिया फारशी लक्षात आली नाही. पण तो कसा होता आणि त्याचे गुन्हेगारी संबंध होते हे आम्हा सर्वांना माहीत आहे... तुम्ही आता आमच्या रडारवर आहात. हा तर फक्त ट्रेलर होता, संपूर्ण चित्रपट पहा. लवकरच प्रदर्शित होईल.. तुम्ही कोणत्याही देशात पळून जा, पण लक्षात ठेवा, मृत्यूला व्हिसाची आवश्यकता नाही. तो न बोलवताही येऊ शकतो.'
या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना गिप्पीने म्हटले की, त्याची सलमानशी मैत्री नाही आणि हा राग उगाचच त्याच्यावर काढला जात आहे. गिप्पी पुढे म्हणाला की, 'मौजा ही मौजा'च्या ट्रेलर लाँचच्या वेळी तो सलमानला भेटला होता. मात्र, त्यावेळी चित्रपटाच्या निर्मात्याने त्याला तिथे आमंत्रित केले होते. या आधी तो 'बिग बॉस'च्या सेटवर सलमानला भेटला होता.
यापूर्वी मार्च महिन्यामध्ये सलमानला बिश्नोई गँगच्या एका सदस्याकडून धमकीचा मेल आला होता. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली होती. तर, याप्रकरणी गुन्हाही नोंदवला होता. राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयए तपास केलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात आहे.
संबंधित बातम्या