देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये जागावाटपाच्या चर्चा सुरू असतानाच आता संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. छत्रपती संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष (Swarajya Party) राज्यात कोणतीही निवडणूक लढणार नाही, असं संभाजी राजे यांनी जाहीर केलं आहे.
महाविकास आघाडीकडून कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना जाहीर झाली आहे. त्यांच्या प्रचारात १०० टक्के उतरणार असल्याचं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. माझ्यासाठी माझे वडिलच सर्वस्व आहेत, वडिलांना संसदेत पाठवण्यासाठी आपण निवडणूक रिंगणातून माघार घेत असल्याचं संभाजी राजे यांनी जाहीर केलं.
संभाजीराजे छत्रपती हेसुद्धा लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू होत्या. गेल्यावेळी राज्यसभेसाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र शिवसेनेसोबत गणित न जुळल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी देऊन त्यांना खासदार बनवले होते. आता लोकसभेसाठी शाहू महाराजांना कोल्हापुरातून मविआकडून उमेदवारी मिळणं निश्चित असल्यानं संभाजीराजे यांनी माघार घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत उभा राहायचं निश्चित होतं पण शाहू महाराज निवडणूक लढवत असतील तर माझा प्रश्नच येत नाही असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
स्वराज्य पक्षाचे राज्यात कुणीही उमेदवार नसतील. आमचे लक्ष फक्त कोल्हापूरवर केंद्रीत आहे. शाहू महाराजांची इच्छा पूर्ण करण्याची आमची जबाबदारी आहे. लोकांचीही तीच इच्छा आहे. आमच्यात जितकी ताकद आहे ती वापरण्याची हीच वेळ आहे. जर त्यांच्यासाठी ताकद नाही वापरली तर वडील अधिपती आहेत असं म्हणून मग उपयोग काय?
२००९ च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले की, २००९ च्या निवडणुकीतून खूप काही शिकलो आहे. राजकारणाचे खूप अनुभव आलेत, आता गाफिल राहून चालणार नाही. त्यापद्धतीने पुढे कामाला लागलो आहे.