Mahayuti Lok Sabha Seat Sharing : सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या निर्धारानं लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजपनं मित्रपक्षांसोबत वाटाघाटी सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जागावाटपाची चर्चा केली. लोकसभेसाठी शिंदे व अजित पवारांच्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, हा आकडाही शाह यांनी या बैठकीत स्पष्ट केल्याचं समजतं.
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. मागील वेळी भाजपनं २६ आणि शिवसेनेनं २२ जागा लढवल्या होत्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिंदे गट भाजपसोबत आहे. शिंदे गटानं मागील वेळेप्रमाणेच जागा मिळाव्यात अशी मागणी केली होती. शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मात्र शिंदे यांनी नरमाईचा सूर लावत १३ जागांची मागणी केली. मात्र, शाह यांनी केवळ १० जागांची ऑफर दिली. त्यामुळं शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अर्ध्यापेक्षाही कमी जागा मिळणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठा गट घेऊन बाहेर पडलेल्या आणि भाजपसोबत गेलेल्या अजित पवारांचीही (Ajit Pawar) गोची झाली आहे. अजित पवार यांनी लोकसभेच्या ८ जागांची मागणी भाजपकडं केली होती. मात्र, त्यांना ४ जागा मिळू शकतात असं शाह यांनी स्पष्टपणे सांगितल्याचं कळतं. त्यात बारामती आणि गडचिरोली या दोन जागांचा समावेश आहे. यातील बारामतीच्या जागेवर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लढणार आहेत, तर गडचिरोलीतून धर्मरावबाबा अत्राम मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अन्य दोन जागा कोणत्या यावर चर्चा सुरू आहे.
भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या लोकप्रियतेवर पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहे. महाराष्ट्रात ४८ पैकी ३२ जागा लढण्यावर भाजप आग्रही आहे. उरलेल्या जागा मित्रपक्षांना सोडण्यात येतील. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप या जागांची भरपाई करून देईल, असं आश्वासन शाह यांनी शिंदे व अजित पवारांना दिलं आहे.
आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपनं मुंबईवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळं मुंबईतील लोकसभेच्या सर्व जागा लढण्याची तयारी भाजपनं केली आहे. शिंदे गटाला केवळ कल्याणची एक जागा दिली जाणार आहे. ठाण्याची जागा भाजप लढवण्याची शक्यता आहे. इथं सध्या ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे हे खासदार आहेत.
संबंधित बातम्या