SRH vs RCB Pitch Report : इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ४१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. हा सामना आज गुरुवार (२५ एप्रिल) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
एकीकडे हैदराबाद संघ चांगली कामगिरी करून प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा प्रबळ दावेदार आहे, तर दुसरीकडे आरसीबीची स्टोरी जवळपास संपली आहे, मात्र अधिकृतरित्या संघ अद्याप स्पर्धेतून बाद झालेला नाही, त्यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा होणार आहे.
दरम्यान, आम्ही तुम्हाला या सामन्यात हैदराबादची खेळपट्टी कशी असेल आणि हैदराबाद-आरसीबी यांच्यातील हेड टू हेड आकडेवारीबद्दलही माहिती देणार आहोत.
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि आरसीबी २४ वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने १३ सामने जिंकले आहेत आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने १० सामने जिंकले आहेत. हैदराबादने आयपीएलमध्ये आरसीबीविरुद्ध सर्वाधिक २८७ धावा केल्या आहेत.
हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांना अनुकुल आहे. अशा स्थितीत पुन्हा चाहत्यांना हाय स्कोअरिंग सामना पाहायला मिळणार आहे. हैदराबादने यंदाच्या आयपीएलमध्ये २७७ धावांची मोठी धावसंख्या याच मैदानावर साकारली होती. इथलं मैदान फार मोठं नसल्यामुळे चौकार-षटकारही भरपूर पाहायला मिळतात.
जर आपण नाणेफेकीबद्दल बोललो तर जो कर्णधार येथे टॉस जिंकतो तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. कारण या मैदानावर ४० सामने नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत आणि केवळ ३२ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघाने चालू मोसमात ७ पैकी ५ सामन्यांत विजयाची चव चाखली आहे. हैदराबाद संघ १० गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीला ८ सामन्यांपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे, आरसीबी संघाला ७ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हैदराबाद संघाने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा ६७ धावांनी पराभव केला होता. तर दुसरीकडे, आरसीबीला केकेआरकडून एका धावेने पराभव स्विकारावा लागला होता.