Rohit Sharma Ajit Agarkar Press Conference : आगामी टी-20 वर्ल्डकप १ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या भूमीवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा संघही जाहीर झाला आहे. बीसीसीआयने एकूण १५ खेळाडूंची निवड केली आहे. एवढेच नाही तर ४ खेळाडू राखीव म्हणून संघासोबत जाणार आहेत.
टी-20 वर्ल्डकपच्या संघ निवडीनंतर आज (२ मे) टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
हार्दिक पंड्याचा खराब फॉर्म असूनही त्याची वर्ल्डकप संघात निवड झाली. या निवडीबाबत अजित आगरकर म्हणाले की, “हार्दिक पंड्याने दुखापतीमुळे दीर्घ काळानंतर पुनरागमन केले आहे आणि मुंबई इंडियन्ससाठी खेळल्या गेलेल्या सर्व सामन्यांमध्ये तो खूपच तंदुरुस्त दिसत आहे. मला वाटत नाही की इतर कोणताही खेळाडू त्याच्याशी स्पर्धा करू शकतो.”
शिवम दुबेच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "दुर्दैवाने शिवम दुबेने आयपीएल २०२४ मध्ये एकही षटक टाकले नाही, पण तो एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे, तो रेड बॉल क्रिकेटमध्ये नियमितपणे गोलंदाजी करतो. त्यामुळे शिवम आणि हार्दिक दोघेही गोलंदाजी करतील."
विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटबाबत आगरकर म्हणाला, "विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटबाबत निवडकर्त्यांमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही. आयपीएलमध्ये त्याचा फॉर्म उत्कृष्ट राहिला आहे. त्याच्या स्ट्राईक रेटची आम्हाला चिंता नाही."
केएल राहुलची निवड न झाल्याबद्दल मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, "केएल राहुल हा उत्कृष्ट फलंदाज आहे, परंतु आम्हाला मधल्या षटकांमध्ये वेगाने फलंदाजी करू शकेल अशा फलंदाजाची गरज होती. राहुल सध्या आयपीएलमध्ये आपल्या संघासाठी सलामीला खेळत आहे.
संघात सध्या कोणत्या जाग रिक्त आहेत, यावरू हा निर्णय घेण्यात आला आहे आणि आम्हाला असे वाटले की ऋषभ पंत आणि संजू सॅमसन मधल्या फळीत वेगाने फलंदाजी करून जबाबदारी सांभाळू शकतात.
रिंकू सिंगबद्दल आगरकर म्हणाले, "आम्हाला रिंकू सिंगबाबत खूप विचार करावा लागला आणि कदाचित आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. त्याने काहीही चुकीचे केलेले नाही आणि शुभमन गिलनेही काही चुकीचे केलेले नाही. हे सर्व टीम कॉम्बिनेशवर आधारित आहे.
विराट कोहलीच्या बॅटिंग नंबरबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “आम्ही खेळपट्टी आणि परिस्थितीची पाहणी करू, आणि तेव्हाच सलामीची जोडी निवडू.”
रोहित शर्मा म्हणाला, "आमची टॉप ऑर्डर चांगली कामगिरी करत आहे. आम्हाला अशा खेळाडूंची गरज होती जे मधल्या फळीत येऊन फटकेबाजी करू शकतील, त्यामुळेच आम्ही शिवम दुबेची निवड केली आहे. आम्ही शिवमची निवड त्याच्या आयपीएल कामगिरीच्या आधारावर केली आहे.
दरम्यान, प्लेइंग इलेव्हनबाबत आताच काही सांगता येणार नाही. आम्ही परिस्थिती आणि पीच पाहून प्लेइंग इलेव्हन तयार करू".
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याबद्दल रोहित म्हणाला, “मी माझ्या कारकिर्दीत अनेक कर्णधारांच्या हाताखाली खेळलो आहे. माझ्यासाठी हे काही नवीन नाही. एखाद्या खेळाडूकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असते आणि गेल्या एक महिन्यापासून मी त्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. हार्दिक पांड्याचे कर्णधारपदाखाली मी तेच करत आहे”.
गोलंदाजीबाबत रोहित शर्मा म्हणाला, "मला ४ फिरकी गोलंदाज हवे होते. सामने सकाळी १० वाजता सुरू होतील. त्यामुळे कदाचित तांत्रिक आधारावर ४ फिरकी गोलंदाज आमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात."