Indonesian bowler Rohmalia Rohmalia : इंडोनेशियाची गोलंदाज रोहमालिया रोहमालिया हिने T20I क्रिकेटमध्ये अविश्वसनीय अशी कामगिरी केली आहे. रोहमालियाने गोलंदाजीत नवा इतिहास रचला आहे. १७ वर्षीय रोहमालियाने एकही धाव न देता ७ विकेट घेतल्या आहेत.
रोहमालिया रोहमालियाने ३.२ षटकात एकही धाव दिली नाही. तिने ७ फलंदाजांची शिकार केली. याआधी असा विक्रम नेदरलँड्सच्या फ्रेडरिक ओव्हरडिकच्या नावावर होता, तिने २०२१ मध्ये आयसीसी महिला टी-२० विश्वचषक पात्रता सामन्यात फ्रान्सविरुद्ध ४ षटकात ३ धावा देत ७ विकेट्स घेतल्या होत्या.
रोहमालिया रोहमालियाने मंगोलियाविरुद्ध ही कामगिरी केली आहे. मंगोलिया आणि इंडोनेशिया यांच्यात ५ सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील शेवटचा सामना उदयन क्रिकेट मैदानावर खेळला गेला. या सामन्यात तिने ७ विकेट घेतल्या.
रोहमालियाने ३.२-३-०-७ अशी विलक्षण कामगिरी करून इतिहास रचला. रोहमालिया रोहमालिया टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारी चौथी गोलंदाज ठरली आहे. रोहमालियाने नेपाळच्या अंजली चंदचाही २०१९ मध्ये केलेला एक खास विक्रम मोडला. अंजली चंदच्या नावावर पदार्पणाच्या सामन्यात २ धावा देत ६ विकेट घेण्याचा विक्रम होता. आता रोहमालियाने शुन्य धावात ७ विकेट घेऊन अंजली चंदचा विक्रम मोडला
रोहमालिया रोहमालिया (इंडोनेशिया महिला): मंगोलिया विरुद्ध ३.२-३-०-७, २०२४
फ्रेडरिक ओव्हरडिक (नेदरलँड महिला): फ्रान्स विरुद्ध ४-२-३-७, २०२१
ॲलिसन स्टॉक्स (अर्जेंटिना महिला): पेरू विरुद्ध ३.४-०-३-७, २०२२
स्याझरुल एजात इद्रास (मलेशिया पुरुष): चीन विरुद्ध ४-१-८-७, २०२३
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंडोनेशियाने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट गमावून १५१ धावा केल्या होत्या. यजमान संघाकडून नी पुटू आयु नंदा साक्रीनीने ४४ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ६१ धावा केल्या. तर मंगलोलियाकडून मेंडबायर एन्खाझुलने शानदार गोलंदाजी करत ४ षटकांत २९ धावांत ४ बळी घेतले.
१५२ धावांचा पाठलाग करताना मंगोलियाचा संघ ४४ धावांत गारद झाला. रोहमालियाच्या गोलंदाजीच्या जोरावर इंडोनेशियाने मंगोलियाला १६.२. षटकांत २४ धावांत गुंडाळले आणि सामना १२७ धावांनी जिंकला.
संबंधित बातम्या