Leopard Attack on Zimbabwe Cricketer : झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू गाय व्हिटल यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यात गाय व्हिटल गंभीर जखमी झाले आहेत. थोडक्यात त्यांचा जीव वाचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाय व्हिटल हुमानी परिसरात ट्रेकिंगसाठी गेले होते, तिथे बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
गाय व्हिटल यांचा पाळीव कुत्रा चिकारा याने बिबट्याशी झुंज देत ५१ वर्षीय मालकाचे प्राण वाचवले. मात्र, चिकाराला बिबट्याने गंभीर जखमी केले असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर गाय व्हिटल यांची पत्नी हॅन्ना यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी पतीचा जखमांनी भरलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या फोटोमध्ये गाय व्हिटल हॉस्पिटलच्या बेडवर पडलेले दिसत आहेत. तसेच संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले दिसत आहे. गाय व्हिटल यांची पत्नी हॅन्ना स्टोक्स यांनी सांगितले की, बिबट्याने हल्ला केला, पण कसा तरी त्यांचा जीव वाचवण्यात यश आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गाय व्हिटल ट्रेकिंगवर गेले होते, त्याचदरम्यान त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला".
दरम्यान, रक्ताने माखलेल्या गाय व्हिटल यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्स गाय व्हिटल यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये गाय व्हिटल यांच्या पलंगाखाली ८ फूट लांब मगर आली होती, ते ज्या पलंगावर झोपले होते त्याच पलंगाखाली ही मगर रात्रभर पडून होती.
गाय व्हिटल यांनी झिम्बाब्वेकडून १९९३ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते, तर २००३ मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ४६ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त त्यांनी १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले.
गाय व्हिटल यांच्या नावावर कसोटी फॉरमॅटमध्ये द्विशतक आहे. या फलंदाजाने कसोटीत २२०७ धावा केल्या, तर व्हिटल यांच्या नावावर एकदिवसीय प्रकारात २७०५ धावा आहेत. गाय व्हिटल यांनी कसोटी फॉर्मेटमध्ये ४ वेळा शतकाचा टप्पा ओलांडला. पण एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकावण्यात ते अपयशी ठरले. वनडेत त्यांनी ११ वेळा अर्धशतकांचा टप्पा ओलांडला.