india squad for t20 world cup 2024 : भारतात सध्या आयपीएल २०२४ चा थरार सुरू आहे. या स्पर्धेनंतर लगेच टी-20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे. यंदाची आयपीएल टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण आयपीएलमधील कामगिरीच्या आधारेच टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडला जाणार आहे.
दरम्यान, टी-20 विश्वचषक १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. सर्व संघांनी १ मे पर्यंत आपापल्या संघांची घोषणा करायची आहे. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा जागतिक क्रमवारीत नंबर वन टी-20 संघ टीम इंडियावर आहे. भारत कोणत्या खेळाडूंसह विश्वचषकात उतरेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आता एका मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर लवकरच १५ खेळाडूंचा संघ निवडण्यासाठी एक बैठक घेणार आहेत, त्यानंतर विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल.
एका वर्तमानपत्राच्या रिपोर्टनुसार, सर्व निवडकर्ते २७ किंवा २८ एप्रिल रोजी दिल्लीत बैठक घेऊ शकतात. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना २७ एप्रिल रोजी अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे, त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा देखील दिल्लीत उपस्थित राहणार आहे.
मुख्य निवडकर्ता अजित आगरकर सध्या स्पेनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत आहेत. ते २७ किंवा २८ एप्रिल रोजी दिल्लीत येऊन थेट बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती आहे.
कर्णधार रोहित शर्माशिवाय विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज हे विश्वचषक संघात असतील, हे जवळपास निश्चित असल्याचा दावाही या मीडिय रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हे सर्व खेळाडू तंदुरुस्त राहिल्यास ते विश्वचषकात नक्कीच खेळतील.
दरम्यान, हार्दिक पांड्या अडचणीत सापडला आहे. त्याच्याबद्दलच्या माहिती आली आहे की त्याच्या मुंबई इंडियन्समधील कामगिरीच्या आधारावर त्याची निवड केली जाईल, जी आतापर्यंत चांगली झालेली नाही.
T20 विश्वचषक २०२४ मध्ये २० संघ सहभागी होतील, जे प्रत्येकी ५ संघांच्या ४ गटांमध्ये विभागले गेले आहेत. भारतीय संघाला अ गटात ठेवण्यात आले असून त्यात पाकिस्तान, अमेरिका, कॅनडा आणि आयर्लंडचाही समावेश आहे.
भारतीय संघ ५ जूनपासून विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान ९ जूनला भिडणार आहेत.
संबंधित बातम्या