मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Everest Fish Curry masala : एव्हरेस्ट फिश करी मसाल्यावर सिंगापूरमध्ये बंदी, स्टॉक परत मागवण्याचे आदेश; काय आहे कारण?

Everest Fish Curry masala : एव्हरेस्ट फिश करी मसाल्यावर सिंगापूरमध्ये बंदी, स्टॉक परत मागवण्याचे आदेश; काय आहे कारण?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 19, 2024 05:19 PM IST

Everest Fish Curry Masala : भारतातील घराघरात वापरल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट कंपनीच्या फिश करी मसाल्यावर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

एव्हरेस्ट फिश करी मसाल्यावर सिंगापूरमध्ये बंदी, स्टॉक बाजारातून परत मागवण्याचे आदेश; काय आहे कारण?
एव्हरेस्ट फिश करी मसाल्यावर सिंगापूरमध्ये बंदी, स्टॉक बाजारातून परत मागवण्याचे आदेश; काय आहे कारण?

Everest Fish Curry Masala : भारतातील घराघरांत लोकप्रिय असलेला एव्हरेस्ट ब्रँडच्या फिश करी मसाल्यावर सिंगापूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. फिश करी मसाल्यात इथिलिन ऑक्साइडचं प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्याचं सिंगापूरमधील खाद्य सुरक्षा यंत्रणेनं म्हटलं आहे. त्यानंतर हे उत्पादन बाजारातून परत घ्यावे, असे निर्देश सिंगापूरमधील सरकारी यंत्रणांनी दिले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

इथिलीन ऑक्साईड हे रसायन मानवी वापरासाठी अयोग्य मानलं जातं. एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यामध्ये या रसायनाचं प्रमाण मर्यादेपक्षा अधिक आढळून आलं आहे. एव्हरेस्ट मसाले भारतातून सिंगापूरमध्ये आयात केले जातात. हाँगकाँगमधील सेंटर फॉर फूड सेफ्टी यंत्रणेनं या संदर्भात अलर्ट दिला होता. त्या अनुषंगानं सिंगापूर सरकारनं एव्हरेस्ट फिश करी मसाल्यावर निर्बंध लादले आहेत.

काय आहे इथिलिन ऑक्साइड?

इथिलीन ऑक्साईड हे एक कीटकनाशक आहे. शेतमालावरील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या कीटकनाशकाची धूम्रफवारणी केली जाते. सिंगापूरच्या नियमांनुसार मसाल्यांच्या उत्पादनांत एका मर्यादेपर्यंत या रसायनाचा वापर करण्यास परवानगी आहे, परंतु एव्हरेस्ट फिश करी मसाल्यातील इथिलीन ऑक्साईडचं प्रमाण आरोग्यास घातक होईल इतकं जास्त आहे, असं हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सिंगापूर फूड एजन्सीनं आयातदार एसपी मुथय्या अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडला ही उत्पादनं बाजारातून परत मागविण्याचे निर्देश दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

एव्हरेस्टचा फिश करी मसाल्याचा वापर कोणी करू नये. ज्यांनी घरातील जेवणात हा मसाला वापरला आहे, त्यांनी आरोग्याकडं लक्ष द्यावं. आरोग्याबद्दल काही तक्रार असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा, असं सिंगापूर फूड एजन्सीनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. एव्हरेस्टनं याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नेस्लेच्या काही उत्पादनांवरही प्रश्नचिन्ह

ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी नेस्लेच्या काही उत्पादनांवर नुकतंच एका अहवालातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. नेस्ले कंपनीकडून भारत आणि इतर आशियाई व आफ्रिकन देशांतील मुलांना पुरवल्या जाणाऱ्या दूध आणि सेरेलॅकमध्ये भेसळ केली जात असल्याचा दावा अहवालातून करण्यात आला आहे. युरोप आणि ब्रिटनच्या बाजारपेठेत मात्र, शुद्ध आणि भेसळरहित सेरेलॅकची विक्री केली जात असल्याचं अहवालात म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याची गंभीर दखल घेतली आहे. नेस्ले इंडियानं मात्र हा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे.

WhatsApp channel

विभाग