मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Ekagrah Murthy : इन्फोसिसच्या एका निर्णयामुळं नारायण मूर्ती यांचा ५ महिन्यांचा नातू एकाग्रला मिळणार ४.२ कोटी रुपये

Ekagrah Murthy : इन्फोसिसच्या एका निर्णयामुळं नारायण मूर्ती यांचा ५ महिन्यांचा नातू एकाग्रला मिळणार ४.२ कोटी रुपये

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 19, 2024 02:26 PM IST

Ekagrah Rohan Murty : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा ५ महिन्यांचा नातू एकाग्र याला कंपनीच्या एका निर्णयामुळं तब्बल ४.२ कोटींचा फायदा झाला आहे.

इन्फोसिसच्या एका निर्णयामुळं नारायण मूर्ती यांचा ५ महिन्यांचा नातू एकाग्र याला मिळणार ४.२ कोटी रुपये
इन्फोसिसच्या एका निर्णयामुळं नारायण मूर्ती यांचा ५ महिन्यांचा नातू एकाग्र याला मिळणार ४.२ कोटी रुपये (PTI)

Ekagrah Rohan Murty : प्रख्यात उद्योजक व इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा नातू एकाग्र मूर्ती हा कंपनीच्या एका निर्णयामुळं अक्षरश: मालामाल होणार आहे. एकाग्र मूर्ती याला इन्फोसिसकडून तब्बल ४.२ कोटी रुपयांचा लाभांश मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीचा निकाल गुरुवारी आला. या निकालाबरोबरच कंपनीच्या संचालक मंडळानं भागधारकांना २८ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली. त्यात २० रुपये अंतिम लाभांश आणि ८ रुपयांच्या विशेष लाभांशाचा समावेश आहे. या निर्णयामुळं गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

नारायण मूर्ती यांच्या नातवालाही कंपनीच्या या निर्णयाचा छप्परफाड फायदा झाला आहे. नारायण मूर्ती यांनी मागच्याच महिन्यात आपल्या नातवाला इन्फोसिसचे १५ लाख शेअर्स भेट म्हणून दिले होते. त्यामुळं मूर्ती यांचा नातू रातोरात कोट्यधीश झाला. आता त्याच्या संपत्तीत आणखी भर पडली आहे.एकाग्र रोहन मूर्तीनं लाभांश उत्पन्नाच्या रूपात ४.२ कोटी रुपये कमावले आहेत.

अंतिम लाभांश आणि विशेष लाभांशासाठी ३१ मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. १ जुलै रोजी पैसे भागधारकांच्या खात्यात येतील, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

एकाग्र मूर्तीकडे किती शेअर्स?

नारायण मूर्ती यांच्या नातवाकडं इन्फोसिससचे ०.०४ टक्के म्हणजे १५ लाख शेअर्स आहेत. सध्याच्या १४०० रुपयांच्या बाजारभावानुसार या शेअर्सचं मूल्य २१० कोटी रुपये आहे. त्यानुसार एकाग्र ४.२ कोटी रुपयांचा लाभांश मिळविण्यास पात्र ठरला आहे.

एकाग्र हा एनआर नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्ती आणि सून अपर्णा कृष्णन यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी बंगळुरू इथं झाला. रोहन मूर्ती यांनी हार्वर्ड विद्यापीठातून संगणक शास्त्रात पीएचडी केली असून ते सोरोको ही सॉफ्टवेअर फर्म चालवतात. अपर्णा कृष्णन मूर्ती मीडियाच्या प्रमुख आहेत.

एकाग्र हा नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचं तिसरं नातवंड आहे. त्यांची मुलगी अक्षता हिला कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.

डिसेंबर तिमाहीअखेरच्या आकडेवारीनुसार, अक्षता मूर्ती यांच्याकडं इन्फोसिसमध्ये १.०५ टक्के, सुधा मूर्ती ०.९३ टक्के आणि रोहन मूर्ती यांची १.६४ टक्के वाटा आहे.

WhatsApp channel

विभाग