शालेय वयात मला शिक्षणाची मुळीच गोडी नव्हती आणि माझ्या आईला त्याबद्दल खूप काळजी वाटत असे. म्हणूनच तिने इयत्ता आठवीला मला टेक्निकल स्कूलमध्ये घातले होते, जेणेकरुन मी पुढे निदान वायरमन किंवा फिटर झालो तरी पुष्कळ, असा तिचा विचार होता. माझे प्रगतिपुस्तक बघून बाबा फारसे काही बोलत नसत. ‘नीट शिकला नाहीस तर पुढे तुझ्या वाट्याला अंगमेहनतीची कामे येतील,’ या शब्दांत ते संभाषण संपवत. पण आई मात्र कळकळीने मला शिक्षणाचे महत्त्व आणि रोजगाराचे कौशल्य याबाबत सांगत असे. अर्थात आईचा उपदेश गांभीर्याने घेण्याइतकी परिपक्वता त्या वयात नसल्याने माझे ‘पहिले पाढे पंचावन्न’ सुरुच होते.
इयत्ता दहावीला गणिताने माझी विकेट काढली. मी एकूण पाच वेळा नापास झालो. त्यातील माझे सर्वांत जास्त गुण म्हणजे १५० पैकी अवघे ५७ होते. अखेर सहाव्या प्रयत्नात मी एकदाचा कसाबसा पास झालो. इयत्ता अकरावीला मी कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हे वाणिज्य शाखेचे गणित मात्र माझ्यासाठी सोपे ठरले. इथे क्लिष्ट प्रमेये, सिद्धता, एकसामायिक समीकरणे, त्रिकोणमिती असे अवघड भाग नव्हते तर नफ्या-तोट्याचे हिशेब, ताळेबंद असे आवडणारे प्रकार होते. पूर्वी गणित सोडवताना माझी आकडेमोड चुकायची म्हणून मी उत्तरे पुन्हा पुन्हा तपासून बघायचो. ती सवय आता मला वरदान ठरली.
इयत्ता बारावी उत्तीर्ण होऊन मी बाबांना दुकानात मदत करण्यासाठी दुबईला गेलो तेव्हा पुढे काय शिकायचे याबाबत चाचपडत होतो. दुकानातून चांगली कमाई होऊ लागल्याने पुढे शिकूच नये, असाही विचार बळावत होता, परंतु त्याच सुमारास घडलेल्या एका प्रसंगामुळे माझे डोळे उघडले आणि मला शिक्षणाची किंमत समजली. आमच्या दुकानात एक आंध्र प्रदेशातील गृहस्थ कामाला होते. ते कमी शिकलेले होते, पण कामात एकदम तत्पर होते. ते स्वतः कष्टाळू होते. मी मालकाचा मुलगा आणि ते नोकर असे नाते आमच्यात नव्हते. मी आजारी पडलो तर ते माझी खूप काळजी घेत. मी त्यांना अप्पा म्हणत असे. पुढे हे अप्पा थकले. त्यांना आंध्र प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी जाण्याची ओढ लागली. नोकरीत जमवलेली सर्व पुंजी घेऊन ते भारतात रवाना झाले. त्यांना आता समृद्धीचे दिवस येतील आणि वृद्धत्व सुखात जाईल, याचा आम्हालाही आनंद होता.
हेही वाचाः Business Ideas: मोका देखके चौका मारनेका...
पुढे एकदा मुंबईत अप्पांचा मुलगा भेटला. अप्पांचे कुशल विचारता त्याने धक्कादायक बातमी सांगितली. अप्पांनी दोन महिन्यांपूर्वी अकस्मात् आत्महत्या केली होती. त्यांच्याबाबत फार दुर्दैवी प्रकार घडला होता. गावी गेल्यावर त्यांनी तेथे जागा खरेदी करुन त्यावर घर बांधले आणि उत्पन्नाचा आणखी एक स्रोत मिळावा म्हणून ते भाड्याने दिले होते. अप्पा निरक्षर असल्याने त्यांना केवळ अंगठा उठवायचे माहित होते. भाडेकरुने त्याचा गैरफायदा घेऊन घर बळकावले. त्या धक्क्याने अप्पांनी आत्महत्या केली होती. मला हे समजताच मी फार अस्वस्थ झालो. अप्पांचे कुटूंबीयही गरीब आणि फारसे शिकलेले नव्हते. ते आपल्याच दैवाला दोष देत होते. मी अप्पांच्या गावी जाऊन एक हुशार वकील गाठला. त्याच्या मदतीने अप्पांचे घर त्यांच्या मुलाबाळांना मिळवून दिले. त्याचवेळी त्यांना अप्पांच्या फोटोसमोर शपथ घ्यायला लावली, की यापुढे शिक्षणाकडे दुर्लक्ष करणार नाही.
निरक्षरता किंवा अल्प शिक्षण कसा विपरीत परिणाम घडवतात, हे दिसून आल्याने मीही उच्च शिक्षण घेण्याचा निश्चय करुन दुबईच्या एका संस्थेत इयत्ता बारावीच्या पुढचे शिक्षण बिझनेस मॅनेजमेंट शाखेमध्ये सुरु केले. दिवसभर कष्ट आणि रात्री अभ्यास, असे तीन वर्षे करुन मी ती पदवी प्राप्त केली. पुढे तेथूनच मी बिझनेस मॅनेजमेंटमधील डॉक्टरेटही उच्च गुणवत्तेसह पूर्ण केली. त्यावेळेस मला १०० टक्क्यांपैकी ९७ टक्के गुण होते आणि मी शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होतो. दहावीला गणितात पाच वेळा नापास झालेला धनंजय तेथून डॉ. धनंजय दातार म्हणून सन्मानाने बाहेर पडला. शिक्षणाने माझ्यातील खूपशा त्रुटी निघून गेल्या. मी आत्मविश्वासाने वावरायला शिकलो.
मित्रांनोऽ ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत, की प्रज्ञा, शील व करुणा प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण आहे. आपण या उपदेशाचे महत्त्व समजून घ्यावे.