या लेखमालेतील हा पहिला भाग मी त्या सर्व गरीब तरुणांना अर्पण करतो ज्यांच्या डोळ्यात भविष्यकाळाची स्वप्ने तरळत आहेत, मनात समृद्धीची आशा आहे आणि अंगात स्वतःला सिद्ध करुन दाखवण्याची हिंमत आहे. माझे बालपण गरिबीत गेले. ही गरिबी अशी होती जिने कधी उपाशी ठेवले नाही किंवा भीक मागू दिली नाही, पण त्याचवेळी गरजेपेक्षा अधिक मिळूही दिले नाही. आई-बाबांपुढे आलेल्या काही अडचणींमुळे माझे इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण अमरावती जिल्ह्यातील शिरखेड या खेड्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. शिरखेड हे माझ्या आईकडचे आजोळ. माझे आजोबा दामोदर कुरुळकर हे तेथील सरकारी रुग्णालयात कंपौंडर होते. त्यांना बेताचा पगार होता. माझ्या आजीचे नाव शांताबाई. खूप खस्ता खात गरीबीत मन मारुन संसार रेटावा लागल्याने आजीचा स्वभाव तिरसट झाला होता.
शिरखेडच्या चार वर्षांच्या वास्तव्यात माझे रोजचे जेवण म्हणजे सकाळी चपाती-वरण, तर रात्री चपाती-दही. ताटात चारीठाव पदार्थ नसायचे. भात आणि गोडधोड केवळ सणासुदीला बनायचे. भाजी, चटणी, कोशिंबीरही क्वचित दिसे. गोड खायची इच्छा झाल्यास दह्यात साखर घालून खाणे ही एकमेव चैन होती. आजोबांच्या घरी लाईट नव्हते. सायंकाळी रॉकेलवर पेटणाऱ्या कंदिलाच्या उजेडात कामे चालत. कंदिलाच्या काचा रांगोळीने पुसणे, वातीवरची काजळी कापणे, रॉकेल गाळून त्यातील कचरा काढणे, ही कामे माझ्याकडे असत. रात्री उशिरापर्यंत दिवा जाळण्याची चैन परवडणारी नसल्याने मी रात्री आजीचा स्वयंपाक उरकायच्या आत गृहपाठ संपवायचो. माझ्याकडे शाळेचा एकच गणवेश होता. रोज तोच धुवून, वाळवून वापरायचा. पावसाळ्यात लवकर वाळत नसे. मग आजी स्वयंपाकाच्या तव्यावर तापवून तो सुकवून देत असे.
माझे आजोबा परिस्थितीमुळे काटकसरी बनले होते. ते स्वतःसाठी टायरचा सोल लावलेल्या स्वस्तातील चपला वापरत. माझ्याकडे चपला नसल्याने मी अनवाणीच शाळेला जायचो. वर्गात दंगा-मस्तीत गणवेशाची बटणे तुटत. ती लावण्याचा व्याप नको म्हणून आम्ही सेफ्टी-पिना लावत असू. त्या पिनचा आणखीही एक फायदा व्हायचा. शाळेत जाताना पायात वारंवार काटे घुसत. ते काढण्यासाठी या पिनसारखे उपयुक्त साधन दुसरे नव्हते. पावसाळ्यात रेनकोट म्हणून डोक्यावर पोते पांघरुन आम्ही शाळेला जात असू. माझ्या सर्व वर्गमित्रांच्या घरी थोड्याफार फरकाने अशीच गरीबी असल्याने कुणालाही लाज वाटत नसे.
गरिबीने माझ्यावर चांगले संस्कार केले. मला काटकसर करायला व पैशाची किंमत ओळखायला शिकवले, एखादी गोष्ट मिळेपर्यंत धीर धरण्याची सवय अंगी बाणवली. आई-वडील आम्हा भावंडांना नेहमी सांगत, ‘बाळांनो! आपल्या घरात तुम्हाला साधे, मोजके, पण पोटभर कायम खायला मिळेल. मात्र दुसऱ्याच्या घरच्या पक्वान्नांवर नजर ठेऊन परान्नाचा लोभ धरु नका.’ मला त्याची इतकी सवय झाली होती, की कुणाच्या घरी गेलो आणि त्यांनी काही खाण्याचा आग्रह केला तर ‘माझे आताच खाणे झाले आहे, पोटात थोडीशीही जागा नाही,’ असे सांगून मी नकार देत असे.
मित्रांनोऽ आपण गरीब असणे हा काही शाप किंवा पूर्वजन्माचे पाप मुळीच नसते. तो आयुष्यातील केवळ एक टप्पा असतो. जिद्द, कष्ट आणि प्रामाणिकपणा या तीन गुणांच्या मदतीने गरीबीवर मात करता येते. एक छान संस्कृत सुभाषित आहे.
उद्योगे नास्ति दारिद्र्यं जपतो नास्ति पातकम्
मौने च कलहो नास्ति, नास्ति जागरतो भयम्
(अर्थ – उद्योग-व्यवसाय केल्याने दारिद्र्य नाहीसे होते. देवाचा नामजप केल्याने पाप नाहीसे होते, गप्प राहिले तर भांडण नाहीसे होते आणि सावध राहिल्याने भीती नाहीशी होते.
गरीबीमुळे माझे खूपदा अपमानही घडले. लहानपणी एका समारंभात एका गृहस्थांनी मला पंगतीत जेवणाच्या ताटावरुन ‘बाळऽ ही पंगत बड्या लोकांसाठी आहे, तू मागच्या पंगतीला बस,’ असे सांगून हाताला धरुन उठवले होते. मी त्यावेळी थोड्या कळत्या, थोड्या अजाण वयात होतो. मला तो अपमान लागून राहिला. मी घरी येऊन आईला ही गोष्ट सांगितल्यावर तिने शुक्रवारची कहाणी सांगून माझी समजूत काढली. ती म्हणाली, “दादाऽ अरे किंमत माणसाला नसून त्याच्या प्रतिष्ठेला असते. तू कष्टाने इतका मोठा हो, की एक दिवस लोकांनी तुला हाताला धरुन सन्मानाने ताटावर बसवले पाहिजे.” मी आईचे शब्द कायम लक्षात ठेवले आणि प्रामाणिकपणे व कष्टाने धंदा करुन सुबत्ता प्राप्त केली. योगायोगाची किंवा मौजेची गोष्ट म्हणजे मला पंगतीतून उठवणारे हेच सद्गृहस्थ पुढील काळात मी दुबईत उद्योजक झाल्याचे कळताच काही मदत मागण्यासाठी वारंवार संपर्क साधू लागले तेव्हा मी आईला फोन करुन हा प्रसंग सांगितला आणि म्हणालो, “आईऽ तुझी शुक्रवारची कहाणी अगदी खरी झाली बघ. किंमत माणसाला नसून पैसा आणि प्रतिष्ठेला असते.”
संबंधित बातम्या