दुबईतील आमच्या दुकानाच्या जवळच एक पीठगिरणी (चक्की) होती. ही गिरणी ज्या बांगलादेशी गृहस्थांच्या मालकीची होती, त्यांना सगळे ‘मुल्लाचाचा’ म्हणत. मितभाषी स्वभावाचे मुल्लाचाचा गिरणी चालवण्याबरोबरच दुबईतील घाऊक धान्य व्यापारातही सक्रिय होते. दुबई शहराचे बार दुबई आणि देरा दुबई असे दोन भाग पडतात जे खाडीने विभागले आहेत. घाऊक धान्याचा व्यापार खाडीपलिकडच्या देरा दुबई या भागात चालायचा. चाचा दिवसातील सकाळचा वेळ त्यांच्या देरा दुबईतील दुकानात, तर दुपारनंतरचा वेळ बार दुबईतील पीठगिरणीत घालवत. कधीही बघावे तेव्हा ते कामात व्यग्र असत.
आम्हाला दुकान सुरु केल्याच्या पहिल्याच वर्षी जबरदस्त नुकसान झाल्याने पैसे वाचवण्यासाठी मी व बाबा त्या काळात अत्यंत काटकसरीने राहात होतो. आम्ही रोज भात, पातळ भाजी व बेकरीत विकत मिळणाऱ्या ब्रेडसारख्या रोट्या (खुबूस) हे तीनच पदार्थ खायचो. बाबा दुकान सांभाळायचे व मी पडेल ते काम करायचो. नोकर ठेवण्याची ऐपत नसल्याने झाडू-पोछा, लादी साफ करणे, मालाची पोती वाहून नेणे ही कामे मीच करत असे. अगदी सायकल घेण्याचीही स्थिती नसल्याने मी खरेदी अथवा वसुलीसाठी दुबईच्या विविध भागांत पायपीट करुन जात होतो. दुकानातील धान्याची पोती मुल्लाचाचांच्या गिरणीत दळणासाठी घेऊन जाण्याचे आणि दळलेले तयार पीठ दुकानात घेऊन येण्याचे काम माझ्याकडे असे.
माझी ही मेहनत बघताना मुल्लाचाचांना मनातून कौतुक वाटत असावे पण त्यांनी तसे कधी बोलून दाखवले नाही. त्यांनीच मला चक्की चालवायला आणि दळण दळायला शिकवले. त्याचा फायदा असा झाला, की उत्तम दर्जाचे धान्य आणि पिठाचा दर्जा यांची पारख करण्याचे माझे ज्ञान वाढीस लागले. मी आमची दळणे दळून झाल्यावर त्यांच्या ग्राहकांचीही दळणे दळून ठेऊ लागलो. या मुल्लाचाचांमुळेच मला पहिला नफाही अनुभवायला मिळाला. मी एक दिवस खरेदीसाठी देरा दुबईमध्ये गेलो होतो. खाडी ओलांडण्यासाठी सर्वसामान्य लोक त्याकाळी छोट्या लाकडी होड्यांचा वाहतुकीचे साधन म्हणून उपयोग करत. या नौकांना अरबी भाषेत ‘अब्रा’ म्हणतात. अब्राचे भाडे खूप स्वस्त असल्याने मीसुद्धा त्यातूनच प्रवास करायचो.
काम आटोपल्यावर नेहमीच्या परिपाठाप्रमाणे मी मुल्लाचाचांच्या दुकानात डोकावलो. मला बघताच ते म्हणाले, “जय बेटाऽ माझ्याकडे उत्तम दर्जाच्या मिरचीच्या तिखटाची एक गोणी (बॅग) आली आहे. तुला हवीय का?” माझ्याकडचे पैसे अन्य मालखरेदीत संपले असल्याने मी त्यांना नकार देऊ लागलो. त्यावर ते म्हणाले, “अरे विचार करत बसू नकोस. चांगली वस्तू हातची सोडायची नसते. माल घेऊन जा आणि पैसे महिनाभराने दे.” मी त्यांची आज्ञा पाळली आणि ते ४० किलोंचे पोते दुपारच्या रणरणत्या उन्हात, ४७ अंश सेल्सियस तापमान असताना पाच किलोमीटर अंतर पाठीवर वाहून आणले. ते तिखट खरोखर अस्सल होते आणि पाठीवरील घामामध्ये मिसळल्याने माझ्या अंगाची आग-आग झाली. गोणी दुकानात आणल्यावर तिखटाच्या खकाण्याची पर्वा न करता मी त्याच्या छोट्या पुड्या तयार केल्या. तिखटाचा दर्जा उत्तम असल्याने ते ग्राहकांना पसंत पडून हातोहात खपले आणि मला चांगला नफा झाला.
मी चाचांची उधारी १५ दिवसांतच चुकती केली. त्या खेपेस मात्र मुल्लाचाचांनी माझ्या पाठीवर थोपटून सांगितले, “जय बेटाऽ अब तेरी कश्ती सफर करने लगी है. हमेशा याद रखना. जिंदगी में मेहनत और हुनर कभी खाली नही जाती.” मित्रांनोऽ वडीलधाऱ्यांच्या अशा मौलिक आणि अनुभवी सल्ल्यांतून मी खूप काही शिकलो आहे. म्हणूनच उद्यमशील तरुणांना मी आवर्जून सांगतो की कष्ट आणि निरीक्षण करत राहा, कौशल्य आपोआप अंगी येईल आणि त्या दोन्हीचे फळ नेहमीच गोड असेल. समर्थ रामदासांनी दासबोधात मनुष्याच्या अंगी कोणते गुण नसतील तर तो दुर्दैवी ठरतो हे सांगताना त्यात कष्ट आणि कौशल्याचा यथार्थ उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात.
विद्या नाही, बुद्धी नाही। विवेक नाही, साक्षेप नाही।
कुशलता नाही, व्याप नाही। म्हणोन प्राणी करंटा॥
(जो शिकत नाही, बुद्धीचा वापर करत नाही, तारतम्य बाळगत नाही, साक्षेप (उद्योग) करत नाही, अंगात कौशल्य नाही किंवा कष्टाळूपणा नाही तो मनुष्य दुर्दैवी (करंटा) ठरतो.)
(लेखक हे ‘अदिल ग्रूप’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत)