Infosys dividend : इन्फोसिसनं केली डिविडंडची घोषणा; एका शेअरमागे किती रुपये मिळणार, पाहा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Infosys dividend : इन्फोसिसनं केली डिविडंडची घोषणा; एका शेअरमागे किती रुपये मिळणार, पाहा

Infosys dividend : इन्फोसिसनं केली डिविडंडची घोषणा; एका शेअरमागे किती रुपये मिळणार, पाहा

Apr 18, 2024 06:18 PM IST

Infosys Dividend : आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसनं चौथ्या तिमाहीच्या निकालांबरोबरच गुंतवणूकदारांना खूषखबर दिली आहे. कंपनीनं भागधारकांसाठी डिविडंड जाहीर केला आहे.

इन्फोसिसनं केली डिविडंडची घोषणा; एका शेअरमागे किती रुपये मिळणार, पाहा
इन्फोसिसनं केली डिविडंडची घोषणा; एका शेअरमागे किती रुपये मिळणार, पाहा

Infosys Q4 Results and Dividend : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल आज जाहीर झाले. या निकालांसोबतच कंपनीनं मागील आर्थिक वर्षांसाठी प्रति शेअर २० रुपये अंतिम लाभांशाची घोषणा केली. तसंच, शेअरमागे ८ रुपयांचा विशेष लाभांश जाहीर केला.

देशातील दुसरी सर्वात मोठी IT सेवा पुरवठादार कंपनी असलेल्या इन्फोसिसनं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीनं ७,९६९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तर, ३७,९२३ कोटी रुपयांचा एकूण महसूल नोंदवला आहे.

इन्फोसिस चौथ्या तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा ६,१२८ कोटी रुपयांपर्यंत असेल, असा अंदाज विश्लेषकांनी एकूण १३ ब्रोकरेजच्या माहितीच्या आधारे वर्तवला होता. मात्र, हा अंदाज फोल ठरवत इन्फोसिसनं जोरदार कामगिरी केली आहे. तिमाही निकालाच्या आधी कंपनीच्या शेअरचा भाव ०.३४ टक्क्यांनी वाढून १४१९.२५ रुपयांवर स्थिरावला आहे.

इन्फोसिसनं वर्षभरात किती दिला परतावा?

इन्फोसिसनं मागच्या वर्षभरात गुंतवणूकदारांना १६ टक्के परतावा दिला आहे. मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात १२३२ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर आता १४२९.५० रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत शेअरमध्ये १९७.३० रुपयांची वाढ झाली आहे. तर, पाच वर्षांत कंपनीच्या शेअरनं ९३.७० टक्के परतावा दिला आहे. मागच्या सहा महिन्यांपासून मात्र शेअरनं नकारात्मक परतावा दिला आहे.

मागील ३ वर्षांतील लाभांश किती होता?

आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीनं एकूण ३४ रुपये (१६.५० रुपये, १७.५० रुपये) लाभांश दिला होता. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीनं प्रत्येक शेअर मागे ३१ रुपये लाभांश जाहीर केला. तर, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये लाभांश २७ रुपये प्रति शेअर होता.

नोकरी सोडून जाण्याच्या प्रमाणात घट

गेल्या वर्षभरात इन्फोसिस कंपनीच्या ॲट्रिशन रेटमध्ये सातत्यानं घट झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या चौथ्या तिमाहीमध्ये २०.९० टक्क्यांवरून हे प्रमाण आता १२.६ टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत हाच आकडा १७.३० टक्क्यांवर होता. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या तिमाहीत अट्रिशन रेट १२.९ टक्के होता.

Whats_app_banner