दुर्दैवी! नवी मुंबईतील पाम बीचवर टॅक्सीची सायकलला धडक, इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा मृत्यू-navi mumbai former intel india head avtar saini dies in fatal cycling accident ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  दुर्दैवी! नवी मुंबईतील पाम बीचवर टॅक्सीची सायकलला धडक, इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा मृत्यू

दुर्दैवी! नवी मुंबईतील पाम बीचवर टॅक्सीची सायकलला धडक, इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा मृत्यू

Feb 29, 2024 09:25 AM IST

Avtar Saini death News : इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत एका टॅक्सीनं त्यांच्या सायकलला धडक दिली होती.

Avtar Saini Passed Away
Avtar Saini Passed Away

Avtar Saini Death News : इंटेल इंडियाचे माजी प्रमुख व प्रख्यात चिप डिझायनर अवतार सैनी यांचं अपघाती निधन झालं आहे. ते ६८ वर्षांचे होते. नवी मुंबईतील पाम बीच रोडवर सायकल चालवत असताना टॅक्सीनं दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. सैनी यांच्या निधनामुळं उद्योगवर्तुळात शोक व्यक्त होत आहे. सैनी यांच्या मागे एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

बुधवारी, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.५० वाजता ते सायकलिंग करत होते. नेरुळ जंक्शन आणि एनआरआय सीवूड्स सिग्नलच्या मध्ये असताना त्यांच्या सायकलला टॅक्सीनं धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे.

चेंबूर अमॅच्युअर सायकलिंग ग्रुपचे ते सदस्य होते. या ग्रुपसह नेहमीप्रमाणे सैनी सायकलिंग करत होते. त्यांच्या सायकलला कॅबनं मागून धडक दिली, त्यामुळं ते घसरले आणि त्यांची सायकल कॅबच्या पुढील चाकाखाली अडकली. या प्रकारामुळं घाबरलेल्या कॅब चालकानं गाडी तशीच पुढं दामटली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळून जाणाऱ्या वाहनचालकांनं ती कॅब अडवली.

या प्रकरणी आरोपी कॅब ड्रायव्हर हृषिकेश खाडे याच्यावर निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र चौकशीत सहकार्य करण्याची व आरोपपत्र दाखल झाल्यावर न्यायालयात हजर राहण्याची नोटीस त्याला बजावण्यात आली आहे. सैनी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.

कोण होते अवतार सैनी?

इंटेलच्या ३८६ आणि ४८६ मायक्रोप्रोसेसर तसंच, पेंटियम प्रोसेसर डिझाइनमध्ये सैनी यांचा सिंहाचा वाटा होता. ‘इंटेल इंडिया’चे ते माजी अध्यक्ष होते. ते मुंबईत वास्तव्यास होते. सैनी यांनी व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी आणि मिनेसोटा विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्सची पदवी घेतली होती. १९८२ मध्ये त्यांनी 'इंटेल'मध्ये नोकरी सुरू केली. तेव्हापासून २००४ पर्यंत ते या कंपनीत होते. इंटेलच्या इंडिया डेव्हलपमेंट सेंटरच्या स्थापनेत त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं. १९९९ मध्ये इंटेल दक्षिण आशियाचे संचालक म्हणून त्यांची निवड झाली. कालांतरानं ते ‘इंटेल’चे भारतातील प्रमुख झाले. निवृत्तीच्या वेळी त्यांनी कंपनीच्या उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली होती.

विभाग