मराठी बातम्या  /  क्रीडा  /  PBKS VS RR : ध्रुव जुरेलने षटकार खेचून सामना फिरवला, शेवटच्या षटकात राजस्थानचा पंजाबवर रोमहर्षक विजय

PBKS VS RR : ध्रुव जुरेलने षटकार खेचून सामना फिरवला, शेवटच्या षटकात राजस्थानचा पंजाबवर रोमहर्षक विजय

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 19, 2023 11:36 PM IST

PBKS vs RR Highlights : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जवर चार गडी राखून विजय मिळवला. राजस्थानने १८८ धावांचे लक्ष्य दोन चेंडू बाकी असताना पूर्ण केले. या पराभवासह पंजाब किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

PBKS vs RR Highlights
PBKS vs RR Highlights

PBKS vs RR Highlights, Indian Premier League 2023 : आयपीएल 2023 च्या ६६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा चार विकेट राखून पराभव केला. १९ मे रोजी धरमशाला येथे झालेल्या सामन्यात पंजाबने राजस्थानला विजयासाठी १८८ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी शेवटच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पूर्ण केले. ध्रुव जुरेलने राहुल चहरच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकत राजस्थानला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने २० षटकांत ५ बाद १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९.४ षटकांत ६ बाद १८९ धावा केल्या. राजस्थानकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक ५१ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ५० आणि शिमरोन हेटमायरने ४६ धावा केल्या. रियान परागने १२ चेंडूत २० आणि ध्रुव जुरेलने ४ चेंडूत नाबाद १० धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनला केवळ दोन धावा करता आल्या. त्याचवेळी जोस बटलरचा खराब फॉर्म कायम राहिल्याने त्याला खातेही उघडता आले नाही.

पंजाबचा डाव

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जची सुरुवात खराब झाली आणि पॉवरप्लेमध्येच त्यांनी तीन विकेट गमावल्या. प्रभसिमरन सिंगला पहिल्याच षटकात ट्रेंट बोल्टने झेलबाद केले. त्याचवेळी अथर्व तायडे (१९) आणि कर्णधार शिखर धवन (१७) सेटनंतर बाद झाले. लियाम लिव्हिंगस्टोनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु तो केवळ ९ धावा करू शकला. नवदीप सैनीने लिव्हिंगस्टोन आणि तायडेला बाद केले, तर धवनची विकेट अॅडम झाम्पाने घेतली.

५० धावांत चार विकेट पडल्यानंतर जितेश शर्मा आणि सॅम करन यांनी मिळून डाव सांभाळला. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी झाली. जितेश शर्माने २८ चेंडूंत तीन चौकार आणि तब्बल षटकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. जितेश बाद झाल्यानंतर, सॅम करन आणि शाहरुख खान यांनी ७३ धावांची तुफानी भागीदारी करत पंजाबला पाच बाद १८७ धावांपर्यंत नेले.

सॅम करनने ३१ चेंडूंचा सामना करत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ४९ धावा केल्या. आणि शाहरुख खानने २३ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या. शाहरुखने आपल्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटच्या दोन षटकांत दोन्ही फलंदाजांनी मिळून ४६ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून नवदीप सैनीने सर्वाधिक तीन खेळाडूंना बाद केले.

WhatsApp channel