मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Jadeja vs CSK: जड्डूने धोनीला शुभेच्छा दिल्या नाही, CSK चे अधिकारी स्पष्टच बोलले

Jadeja vs CSK: जड्डूने धोनीला शुभेच्छा दिल्या नाही, CSK चे अधिकारी स्पष्टच बोलले

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jul 09, 2022 07:12 PM IST

अष्टपैलू रवींद्र जडेजाने CSK शी संबंधित जवळपास सर्व सोशल मीडिया पोस्ट हटवल्या आहेत. अशा स्थितीत फ्रँचायझी आणि जडेजा यांच्यात वाद सुरू असल्याची चर्चा आहे, मात्र CSK कडून असे काही नसल्याचे सांगण्यात आले आहे.

ravindra jadeja
ravindra jadeja

अष्टपैलू रवींद्र जडेजाने आयपीएलच्या २०२१ आणि २०२२ मोसमाव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्ज अर्थात CSK शी संबंधित सर्व सोशल मीडिया पोस्ट हटवल्या आहेत. रवींद्र जडेजाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर सीएसकेशी संबंधित फक्त काहीच पोस्ट पाहिल्या जाऊ शकतात. अशा परिस्थितीत फ्रँचायझी आणि जड्डू यांच्यात सर्व काही ठीक नाही, असे म्हटले जात आहे, परंतु CSK च्या एका अधिकाऱ्याने सर्व काही ठीक असल्याचे सांगितले आहे.

एएनआयशी बोलताना चेन्नई सुपर किंग्ज अर्थात सीएसकेच्या अधिकाऱ्याने जडेजा आणि फ्रँचायझी यांच्यात सुरू असलेल्या वादाबद्दल सांगितले की, " हे पाहा, हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. (सीएसकेशी संबंधित सोशल मीडिया पोस्ट हटवणे) आम्ही आमच्या बाजूने योग्य आणि स्पष्ट आहोत. आमच्यात सर्व ठीक आहे. काहीही चुकीचे घडत नाही." त्याचवेळी रवींद्र जडेजाने एमएस धोनीला यावर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत,  यावर विचारले असता, ‘मला अशा कोणत्याही घटनेची माहिती नाही’, असे अधिकाऱ्याने सांगितले.

विशेष म्हणजे, धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा न देणे. तसेच नंतर CSK शी रीलेटेड सोशल मीडिया पोस्ट डीलिट करणे, यावरुन फ्रँचायझी आणि जडेजा यांच्यामध्ये काहीतरी बिनसले आहे, अशी चर्चा सुरु आहे.

कर्णधार पदावरुन हटवल्याने जडेजा नाराज?

जडेजा २०१२ पासून चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. १० वर्षांत त्याने संघासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. दरम्यान, आयपीएल २०२२ सुरू होण्याच्या दोन दिवस आधी महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर रवींद्र जडेजाला कर्णधार बनवण्यात आला. मात्र, त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी फारच निराशाजनक राहिली. त्यामुळे केवळ ३७ दिवसांनंतरच जडेजाला कर्णधार पदावरुन हटवले गेले. त्यानंतर पुन्हा धोनीला चेन्नई संघाच्या कर्णधारपदाची कमान सोपवण्या आली.

विशेष म्हणजे, चेन्नई सुपर किंग्सने यावेळच्या आयपीएल लिलावापूर्वी धोनी-जडेजासह ४ खेळाडूंना रिटेन केले होते. जाडेजाला फ्रँचायझीने सर्वाधिक १६ कोटी रुपये देऊन रिटेन केले होते. तर धोनीला केवळ १२ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. 

WhatsApp channel