MS Dhoni IPL Retirement : यंदाच्या इंडियन प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सला धूळ चारत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. गेल्या हंगामात चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर होता, परंतु यंदाच्या हंगामात धोनी ब्रिगेडने जोरदार पुनरागमन करत थेट आयपीएलचा किताब जिंकला आहे. सीएसकेने विजेतेपद पटकावलं तर महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार असल्याची जोरदार चर्चा रंगलेली होती. परंतु आता आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने निवृत्तीच्या सर्व चर्चांवर थेटपणे भाष्य करत सगळा सस्पेन्स एका झटक्यात संपवला आहे.
आयपीएलची फायनलमध्ये गुजरातला पराभूत करत विजेतेपद पटकावल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्याशी संवाद साधला आहे. त्यात धोनीने पुढील आयपीएल खेळण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. चाहत्यांनी भरभरून प्रेम दिल्यामुळं आता निवृत्तीबाबत बोलणं योग्य ठरणार नाही. मला चाहत्यांच्या प्रेमाची परतफेड करायची असून निवृत्तीचा निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे सात ते आठ महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळं पुढची आयपीएल खेळण्याचा पुरेपुर प्रयत्न करणार असल्याचंही महेंद्रसिंह धोनीने म्हटलं आहे. धोनी सध्या तरी निवृ्त्ती घेणार नसल्याचं स्पष्ट होताच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
हर्षा भोगले यांच्याशी बोलताना महेंद्रसिंह धोनी म्हणाला की, चाहत्यांनी माझ्यावर केलेलं प्रेम पाहून माझे डोळे पाणावले आहे. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा चाहत्यांचं प्रेम माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळं मलाही त्यांना आणखी एक गिफ्ट द्यायचं आहे, आणखी एका आयपीएलमध्ये खेळणं माझ्यासाठी सोपी गोष्ट नसेल. परंतु तरीही मी प्रचंड मेहनत करून पुढच्या हंगामात खेळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं धोनीने म्हटलं आहे. यापूर्वी जॉनी मॉरिसन यांनी धोनीला निवृत्तीबाबतचा प्रश्न केला होता, त्यावर बोलताना धोनीने 'तुम्हाला आणि लोकांना वाटतं की मी निवृत्त होऊ शकतो, परंतु निवृत्तीबाबतचा निर्णय घेण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ असल्याचं' महेंद्रसिंह धोनीने म्हटलं होतं.