मराठी बातम्या  /  क्रीडा  /  IPL 2023 Final : रहाणे-रायडूनं चेन्नईला सामन्यात परत आणलं, असा होता सीएसकेच्या डावाचा संपूर्ण थरार

IPL 2023 Final : रहाणे-रायडूनं चेन्नईला सामन्यात परत आणलं, असा होता सीएसकेच्या डावाचा संपूर्ण थरार

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 30, 2023 02:28 AM IST

GT vs CSK, Final Match Highlights : IPL 2023 Final GT vs CSK : आयपीएलच्या अंतिम सामन्यात पावसामुळे चेन्नई सुपर किंग्जला डकवर्थ लुईस नियमानुसार १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. चेन्नईने ५ गडी गमावून हे लक्ष्य गाठले.

GT vs CSK Final Match Highlights
GT vs CSK Final Match Highlights

IPL 2023 Final GT vs CSK Final : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव केला. सीएसकेच्या विजयाचा हिरो ठरला तो रवींद्र जडेजा, त्याने शेवटच्या दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. एमएस धोनीच्या टीम चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या बाबतीत धोनीने आता रोहित शर्माची बरोबरी केली आहे

चेन्नई संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. गुजरातकडून हे षटक टाकण्याची जबाबदारी मोहित शर्माकडे सोपवण्यात आली होती. तर क्रीजवर शिवम दुबे होता. मोहितने पहिल्या चेंडूवर एकही धाव दिली नाही. यानंतर ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर फक्त १ धाव आली. आता चेन्नईला ४ चेंडूत १२ धावांची गरज होती. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर १-१ धावा आली.

आता सीएसकेला विजयासाठी शेवटच्या दोन चेंडूंवर १० धावांची गरज होती. तेव्हा रवींद्र जडेजा क्रीजवर होता. त्याने मोहित शर्माच्या चेंडूवर प्रथम षटकार आणि नंतर चौकार मारून चेन्नईला विजय मिळवून दिला.

१५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले.

तत्पूर्वी, या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज २१५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा तिसऱ्या चेंडूनंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला. सुमारे २ तासांनंतर सामना पुन्हा सुरू झाला तेव्हा चेन्नईला डकवर्थ लुईस नियमानुसार १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले.

ऋतुराज-कॉनवेची धमाकेदार सुरुवात

चेन्नईच्या डावाची सुरुवात करण्यासाठी उतरलेल्या ऋतुराज गायकवाड आणि डेव्हन कॉनवे यांनी संघाला वेगवान सुरुवात देण्याचे काम केले. ४ षटकांचा खेळ संपला तेव्हा चेन्नईची धावसंख्या एकही न गमावता ५२ धावांवर पोहोचली होती. यानंतर ६ षटकांचा खेळ संपला तेव्हा संघाच्या बिनबाद ७२ धावा झाल्या होत्या.

नूर अहमदने एकाच षटकात ऋतुराज-कॉनवेला बाद केलं

या सामन्यात गुजरात टायटन्सने टाइमआऊट ब्रेकनंतर ७व्या षटकात पुनरागमन करत चेन्नई संघाला २ मोठे धक्के दिले. नूर अहमदने प्रथम ऋतुराज गायकवाडला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर त्याच षटकात डेव्हॉन कॉनवेची विकेट घेत त्याने गुजरातला या सामन्यात परत आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावली.

अजिंक्य रहाणेनं सीएसकेला सामन्यात परत आणलं 

एकाच षटकात २ विकेट्स गमावल्यानंतर अचानक चेन्नई सुपर किंग्जचा संघ दडपणाखाली दिसत होता, पण शिवम दुबेसह अजिंक्य रहाणेने चेन्नईला पुन्हा सामन्यात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रहाणेने डावाच्या ८व्या षटकात दोन षटकारांसह १६ धावा केल्या. यासह चेन्नईची धावसंख्या ८ षटकांत ९४ धावांपर्यंत पोहोचली. चेन्नईने १० षटक संपल्यानंतर ११२ धावा केल्या होत्या. या सामन्यात सीएसकेला तिसरा धक्का ११७ धावांवर रहाणेच्या रूपाने बसला, जो १३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७ धावांची खेळी खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला.

मोहित शर्माने रायडू-धोनीला एकाच षटकात बाद केले

१२ षटक संपल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने ३ गडी गमावून १३३ धावा केल्या होत्या. शेवटच्या ३ षटकात संघाला विजयासाठी ३९ धावांची गरज होती. गुजरातकडून डावाच्या १३व्या षटकासाठी आलेल्या मोहित शर्माने पहिल्या ३ चेंडूत १६ धावा दिल्या. यानंतर मोहितने पुनरागमन करत पुढच्या २ चेंडूंवर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंग धोनीला पॅव्हेलियनमध्ये पाठवून चेन्नईला २ मोठे धक्के दिले. १३ षटक संपल्यानंतर चेन्नईची धावसंख्या ५ गड्यांच्या मोबदल्यात १५० धावा होती.

२ षटकात २१ धावांची गरज

गुजरातकडून मोहम्मद शमीने १४ वे षटक टाकले. या षटकात त्याने केवळ ८ धावा दिल्या. यानंतर शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १३ धावांची गरज होती. या षटकातील पहिल्या ४ चेंडूत चेन्नईचा संघ केवळ ३ धावा करू शकला. शेवटच्या २ चेंडूत १० धावा करत रवींद्र जडेजाने चेन्नईला ५व्यांदा विजेतेपद मिळवून दिले. गुजरातकडून या सामन्यात मोहित शर्माने ३ आणि नूर अहमदने २ बळी घेतले.

WhatsApp channel