मराठी बातम्या  /  क्रीडा  /  rr vs csk : संजू सॅमसनची कमाल! धोनीच्या सीएसकेला सलग चार वेळा हरवून रोहित शर्माला टक्कर

rr vs csk : संजू सॅमसनची कमाल! धोनीच्या सीएसकेला सलग चार वेळा हरवून रोहित शर्माला टक्कर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 28, 2023 12:09 PM IST

Sanju Samson record vs csk : चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सलग चौथा विजय मिळवून संजू सॅमसननं अनोखा विक्रम रचला आहे.

Sanju Samson - MS Dhoni
Sanju Samson - MS Dhoni

Sanju Samson record vs csk : इंडियन प्रीमिअर लीगचा दुसरा टप्पा आता सुरू झाला असून दिवसागणिक स्पर्धेतील चुरस वाढत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विक्रमांचीही नोंद होत आहे. विक्रमांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी खेळाडूंमध्ये चढाओढ सुरू आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यानं या चढाओढीत एक पाऊल पुढं टाकलं आहे.

आयपीएल स्पर्धेतील ३७ वा सामना गुरुवारी रात्री राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं सीएसकेचा ३२ धावांनी पराभव केला. राजस्थानचा या मोसमातील चेन्नईवरचा हा दुसरा आणि सलग चौथा विजय आहे. या विजयासह राजस्थान रॉययल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसननं एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चेन्नई सुपर किंग्जला सर्वाधिक सलग सामन्यात पराभूत करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत सॅमसन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे.

PBKS vs LSG Head To Head: आज पंजाब- लखनौ यांच्यात चुरशीची लढत; पाहा दोन्ही संघातील हेड टू हेड रेकॉर्ड

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सनं २०२१ ते २०२३ दरम्यान एकूण ४ वेळा चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता, तर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सनं २०१८ ते २०१९ दरम्यान सलग ५ वेळा CSK चा पराभव केला होता. चालू स्पर्धेत प्लेऑफमध्ये RR आणि CSK ची टक्कर झाल्यास आणि त्यातही राजस्थाननं बाजी मारल्यास संजू सॅमसन रोहित शर्माची बरोबरी करू शकणार आहे.

CSK विरुद्ध सर्वाधिक सलग सामने जिंकणारे कर्णधार

५ - रोहित शर्मा (२०१८-१९)

४- संजू सॅमसन (२०२१/२३)*

३ - रोहित शर्मा (२०१५)

३ - जॉर्ज बेली (२०१४)

३ - श्रेयस अय्यर (२०२०/२२)

३ - अनिल कुंबळे (२००९/१०)

PBKS vs LSG Live Streaming: पंजाबचे किंग्ज आज लखनौच्या संघाशी भिडणार; कधी, कुठे पाहणार सामना?

काल मैदानात काय घडलं?

गुरुवारच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या ७७ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर राजस्थाननं २०२ धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना सीएसकेचा डाव ६ गडी गमावून १७० धावांवर आटोपला. चेन्नईकडून शिवम दुबेनं अर्धशतक झळकावलं, तर ऋतुराज गायकवाडनं ४७ धावा कुटल्या. राजस्थानकडून अॅडम झम्पानं सर्वाधिक तीन बळी घेतले. यशस्वी जयस्वाल याला सामनावीराचा मान मिळाला.

WhatsApp channel

विभाग