मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Indian Football: भुतिया-छेत्री आहेतच, पण यांना विसरून कसं चालेल? पाहा भारताचे स्टार फुटबॉलपटू

Indian Football: भुतिया-छेत्री आहेतच, पण यांना विसरून कसं चालेल? पाहा भारताचे स्टार फुटबॉलपटू

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 18, 2022 06:11 PM IST

Best Footballers In India: भारतात सुनील छेत्री आणि बाईचुंग भूतिया यांच्याशिवाय कोणत्याही दुसऱ्या फुटबॉल खेळाडूचे नाव चाहत्यांना माहिती नसेल. पण फुटबॉलमध्येही IPL प्रमाणे ISL ने चमत्कार घडवला. यानंतर चाहत्यांना चेन्नई, गोवा, मुंबई आणि बंगळुरूसारख्या क्लबची नावे कळली. नाहीतर लोकांना मोहन बागान व्यतिरिक्त कोणत्याही क्लबचे नाव माहित नव्हते.

Indian Football
Indian Football

भारतीय फुटबॉलसाठी १६ ऑगस्ट हा दिवस अत्यंत वाईट ठरला. जागतिक फुटबॉलची सर्वोच्च प्रशासकीय संस्था फिफाने मंगळवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (AIFF) निलंबित केले आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या अंडर-१७ महिला विश्वचषक स्पर्धेचे यजमानपदही काढून घेतले. ८५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच FIFA ने AIFF वर बंदी घातली. या बातमीने भारतीय फुटबॉल खेळाडू आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

भारतात क्रिकेटला सर्वाधिक महत्व दिले जाते. क्रिकेटमध्ये कुणी पदार्पण केले, किंवा कोण करणार आहे, अशा सर्व गोष्टी चाहत्यांना ठाऊक असतात. लहानात लहान क्रिकेट संघांचीही नावे भारतीय क्रिकेट चाहत्यांना माहिती असतात. पण, फुटबॉलमध्ये याच्या अगदी उलट आहे. सुनील छेत्री आणि बाईचुंग भूतिया यांच्याशिवाय कोणत्याही दुसऱ्या खेळाडूचे नाव भारतीय चाहत्यांना माहिती नसेल. अगदी तो भारतासाठी जरी फुटबॉल खेळला असेल तरी.

पण फुटबॉलमध्येही IPL प्रमाणे ISL ने चमत्कार घडवला. यानंतर चाहत्यांना चेन्नई, गोवा, मुंबई आणि बंगळुरूसारख्या क्लबची नावे कळली. नाहीतर लोकांना मोहन बागान व्यतिरिक्त कोणत्याही क्लबचे नाव माहित नव्हते.

भारतातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू

सुनील छेत्री (sunil chhetri)

सुनील छेत्री सध्या भारतीय संघाचा कर्णधार आहे. यासोबतच तो आयएसएलमध्ये बंगळुरू संघाचीही कमान सांभाळत आहे. फॉरवर्ड खेळाडू सुनील छेत्री सध्याच्या घडीला सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारा जगातील तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी फक्त क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी हे खेळाडू आहे.

बायचुंग भुतिया (Bhaichung Bhutia)

माजी स्टार खेळाडू बायचुंग भुतियाने भारतीय फुटबॉलला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. त्याने १९९५ मध्ये पदार्पण केले होते. वयाच्या १९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय गोल करणारा तो भारताचा सर्वात तरुण खेळाडू ठरला. भुतियाने भारतासाठी ८२ सामन्यांत ४१ गोल केले.

शब्बीर अली (Shabbir Ali)

भारतीय फुटबॉल संघाचे सध्याचे व्यवस्थापक आणि माजी फुटबॉलपटू शब्बीर अली हे एक उत्कृष्ट खेळाडू होते. त्यांना मेजर ध्यानचंद पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. शबीर यांनी १९७४ ते १९८४ दरम्यान देशासाठी ७२ सामन्यांत २३ गोल केले.

सुब्रत पाल (Subrata Pal)

३५ वर्षीय सुब्रत पाल हा भारतीय फुटबॉल संघाचा सर्वोत्तम गोलकीपर मानला जातो. त्याने देशासाठी ६७ सामने खेळले, ज्यात ९२ गोल वाचले आहेत. त्याने २००७ मध्ये पदार्पण केले होते.

जेजे लालपेखलुआ (Jeje Lalpekhlua)

भारतीय संघात स्ट्रायकर म्हणून खेळणारा ३१ वर्षीय जेजे लालपेखलुआ हा देखील एक उत्तम खेळाडू आहे. आयएसएलमध्ये सर्वाधिक गोल करणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे. जेजे चेन्नईयन फुटबॉल क्लबकडून खेळतो.

भारतातील सर्वोत्तम ५ फुटबॉल क्लब

मोहन बागान अॅथलेटिक क्लब - सर्वाधिक वेळा आयएसएल विजेतेपद जिंकले. (तीन वेळा)

चेन्नईयन फुटबॉल क्लब - हा संघ आयएसएलमध्ये दोनदा चॅम्पियन बनला आहे.

बेंगळुरू एफसी - सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील या क्लबने २०१९ मध्ये एकदाच विजेतेपद पटकावले होते.

मुंबई सिटी- २०२१ मध्ये हा क्लब चॅम्पियन बनला होता. फानलमध्ये मुंबई सिटीने मोहन बगानला धुळ चारली होती.

हैदराबाद एफसी - या क्लबने  गेल्या आयएसएल मोसमात विजेतेपद पटकावले होते.

WhatsApp channel