मराठी बातम्या  /  क्रीडा  /  फिफाचा भारताला दणका! AIFF वर निलंबनाची कारवाई, अंडर १७ महिला वर्ल्डकपचे आयोजन अडचणीत

फिफाचा भारताला दणका! AIFF वर निलंबनाची कारवाई, अंडर १७ महिला वर्ल्डकपचे आयोजन अडचणीत

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 16, 2022 08:01 AM IST

FIFA Suspend AIFF: फिफा परिषदेच्या ब्युरोने सर्वानुमते त्रयस्त पक्षाच्या हस्तक्षेपामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित करण्याचा निर्णय़ घेतला आहे.

फिफाने AIFF वर केली निलंबनाची कारवाई
फिफाने AIFF वर केली निलंबनाची कारवाई (फोटो - एएफपी)

FIFA Suspend AIFF: फिफाने त्रयस्त पक्षाच्या हस्तक्षेपाचा ठपका ठेवत अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केली आहे. फिफाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, फिफा परिषदेच्या ब्युरोने सर्वानुमते त्रयस्त पक्षाच्या हस्तक्षेपामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबित करण्याचा निर्णय़ घेतला आहे. फिफाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्यानं ही कारवाई केली आहे.

AIFF कार्यकारी समितीचे अधिकार घेण्यासाठी प्रशासकांची एक समिती स्थापन करण्याचा आदेश रद्द होईपर्यंत आणि AIFF प्रशासनाचे AIFF वर पूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत निलंबन कायम राहील असंही फिफाने म्हटलं आहे.

दरम्यान, फिफाच्या या निर्णयामुळे फिफा अंडर १७ महिला वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेचे आयोजन भारतात होणार नाही. ११ ते ३० ऑक्टोबर २०२२ रोजी ही स्पर्धा होणार असून त्याचे आयोजन भारतात करण्यात आले होते. मात्र आता ते करता येणार नाही. स्पर्धेसंबंधी आम्ही पुढे काय करायचं यावर चर्चा करत आहे, गरज पडल्यास हे प्रकरण परिषदेच्या ब्युरोकडे पाठवले जाईल असे फिफाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. या हस्तक्षेपामुळेच ही कारवाई झाल्याचं म्हटलं जात आहे.अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा कारभार सध्या प्रशासकीय समिती पाहत आहे. या समितीने दिलेल्या प्रस्तावानुसार निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीची प्रत आम्हाला पाठवा असे निर्देश फिफाने एआयएफएफला दिले होते. त्यावेळी एआयएफएफचे सरचिटणीस सुनंदो धर यांनी निलंबनाच्या कारवाईची आणि अंडर १७ महिला वर्ल्ड कपचे यजमानपद गमावण्याची भीती व्यक्त केली होती.

WhatsApp channel