मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Shabnam Singh: युवराज सिंहच्या आईला ब्लॅकमेल करून ४० लाख रुपयांची मागणी; आरोपीला अटक

Shabnam Singh: युवराज सिंहच्या आईला ब्लॅकमेल करून ४० लाख रुपयांची मागणी; आरोपीला अटक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jul 26, 2023 02:55 PM IST

Yuvraj Singh mother blackmailed: भारताचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंहच्या आईला ब्लॅकमेल करून ४० लाखांची मागणी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली.

Yuvraj Singh and Shabnam Singh
Yuvraj Singh and Shabnam Singh

Shabnam Singh blackmailed: भारतीय क्रिकेट संघाला २००७ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माजी अष्टपैलू युवराज सिंगची आई शबनम सिंह यांना ब्लॅकमेल करून ४० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी एका महिलेला अटक केली. कुटुंबाला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन या महिलेने पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुरूग्राम पोलीस अधिक तपास करीत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हेमा कौशिक असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. हेमा कौशिकला युवराजच्या भावाची काळजी घेण्यासाठी कामावर ठेवले होते. मात्र, काही कारणांवरून तिला २० दिवसानंतरच कामावरून काढून टाकण्यात आले. यानंतर १९ जुलै २०२३ रोजी आरोपी हेमाने शबनम सिंह यांना व्हॉट्सअॅप कॉल आणि मेसेज पाठवून खोट्या प्रकरणात अडकवून कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्याकडे ४० लाखांची मागणी केली. याचबरोबर हेमाने २३ जुलै २०२३ रोजी संपूर्ण कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी शबनम सिंह यांनी ही रक्कम मोठी असल्याचे सांगितले. तेव्हा सोमवारपर्यंत हेमाला पाच लाख रुपये देण्याचे ठरले.

यानंतर शबनम सिंह यांनी गुरूग्राम पोलिसांना हेमाविरुद्ध तक्रार दिली. तसेच संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. या तक्रारीनंतर गुरूग्राम पोलिसांनी सापळा रचून युवराज सिंगच्या आईकडून पाच लाख रुपये घेताना आरोपी महिलेला अटक केली.

महत्त्वाचे म्हणजे, आरोपी महिलेची जामिनावर सुटका झाली आहे. परंतु, तिच्याविरुद्ध बेकायदेशीर खंडणीच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असल्याचे गुरुग्रामचे पोलीस उपायुक्त नितीश अग्रवाल यांनी सांगितले.

WhatsApp channel

विभाग