मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pathaan Movie : मी शाहरुख खानला ओळखत नाही; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य!

Pathaan Movie : मी शाहरुख खानला ओळखत नाही; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 22, 2023 06:10 PM IST

himanta biswa sharma on shahrukh khan : कोणत्याही चित्रपटांवर बोलणं गरजेचंच आहे का?, असा सवाल करत पीएम मोदींनी भाजप नेत्यांना फटकारलं होतं. त्यानंतर आता आसामच्या मुख्यमंत्र्यांनी शाहरुख खानवर बोलणं टाळलं आहे.

himanta biswa sharma on pathaan movie
himanta biswa sharma on pathaan movie (HT)

himanta biswa sharma on pathaan movie : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेला पठाण चित्रपटाला सध्या हिदुत्ववादी संघटनांकडून विरोध होत आहे. गुजरातसह कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याची धमकी दिली आहे. परंतु आता भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान मोदी यांनी भाजप नेत्यांना फटकारल्यानंतर आता अनेक वाचाळ नेत्यांनी शाहरुखच्या चित्रपटावर सावध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा यांना पत्रकारांनी पठाण चित्रपटाबद्दल प्रश्न केला असता त्यांनी शाहरुख खानला ओळखत नाही आणि त्याच्या चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती नसल्याचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळं आता भाजप नेत्यांकडून पठाणला होणारा विरोध मावळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुवाहाटीमध्ये चित्रपटगृहात पठाण चित्रपटाचे पोस्टर्स जाळले होते. याबाबत पत्रकारांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा यांना प्रश्न केला असता त्यांनी शाहरुख खानला ओळखत नसल्याचं वक्तव्य केलं. शाहरुख खान कोण आहे?, मला त्याच्याबद्दल किंवा त्याच्या चित्रपटांबद्दल कोणतीही माहिती नाहीये. आसामच्या लोकांनी हिंदी नव्हे तर आसामी चित्रपटांची काळजी घ्यायला हवी, असंही मुख्यमंत्री शर्मा म्हणाले. पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यात अभिनेत्री दीपिका पादुकोनने भगव्या रंगाची बिकीनी घातल्यामुळं हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाला विरोध केला होता. त्यानंतर आता सेन्सॉर बोर्डानं पठाण चित्रपटात सहा बदल सूचवले आहेत. त्यानंतर आता हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

शाहरुखने मध्यरात्री दोन वाजता फोन केला- मुख्यमंत्री शर्मा

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुवाहाटीत पठाण चित्रपटाचे पोस्टर्स जाळल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने मध्यरात्री दोन वाजता फोन करून प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केल्याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री शर्मा यांनी केला आहे. आसाममधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम आसाम सरकारचं असल्याचं सांगत प्रकरणाची चौकशी करून अशा घटना रोखण्याचं आश्वासन शाहरुखला दिल्याचं मुख्यमंत्री शर्मा यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

IPL_Entry_Point