मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  K N Tripathi: कोणाशी साधी चर्चाही न करता काँग्रेसचे अध्यक्ष बनायला निघालेले केएन त्रिपाठी आहेत कोण?

K N Tripathi: कोणाशी साधी चर्चाही न करता काँग्रेसचे अध्यक्ष बनायला निघालेले केएन त्रिपाठी आहेत कोण?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 30, 2022 02:59 PM IST

Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेली दोन मोठी नावं मागे पडल्यानंतर आता कुणाच्या ध्यानीमनी नसलेला तिसरा नेताही निवडणुकीत उतरला आहे.

K N Tripathi
K N Tripathi

K N Tripathi in Congress President Election: काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर या दोघांमध्ये टक्कर होईल असं वाटत असतानाच आता तिसऱ्या एका उमेदवारानं निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. के. एन. त्रिपाठी असं या नेत्याचं नाव आहे. एका राज्यापुरती ओळख असलेले त्रिपाठी कुणाशी सल्लामसलत न करताच अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत.

झारखंड सरकारमध्ये मंत्री राहिलेले व मेदिनीनगरचे रहिवासी असलेले के एन त्रिपाठी अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी शुक्रवारी दिल्लीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक लढविण्याबाबत आपण किती गंभीर आहात आणि या संदर्भात पक्षाच्या हायकमांडशी चर्चा झाली आहे का, या प्रश्नावर त्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली. ‘तुम्ही मला गांभीर्यानं का घेत नाही? काँग्रेस हा लोकशाहीवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. पक्षात अंतर्गत लोकशाही आहे. एखादा शेतकऱ्यांचा मुलगाही आमच्या पक्षात अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो. भाजपसारख्या पक्षात ते शक्य नाही, असं ते म्हणाले. अर्थात, ’मी आज अर्ज दाखल केला असला तरी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा आदर केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

के. एन. अर्थात कृष्णानंद त्रिपाठी हे माजी सैनिक आहेत. राजकारणात प्रवेश करण्याआधी ते भारतीय हवाई दलात होते. लष्कराची नोकरी सोडून ते राजकारणात आले आणि २००५ साली पहिल्यांदा काँग्रेसच्या तिकिटावर डाल्टनगंज मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र इंदरसिंग नामधारी यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसचे उमेदवार म्हणून डाल्टनगंजची जागा लढवली आणि निवडणूक जिंकली. आमदार झाल्यानंतर त्यांना राज्य सरकारमध्ये ग्रामविकास मंत्रीपदाची संधी मिळाली. केएन त्रिपाठी हे एका शेतकरी कुटुंबातून आले आहेत.

केएन त्रिपाठी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असली तरी खरी लढत खर्गे आणि थरूर यांच्यातच होईल, असं मानलं जात आहे. त्यातही थरूर यांनी ऐनवेळी माघार घेतल्यास पक्षश्रेष्ठी त्रिपाठी यांनाही अर्ज मागे घेण्यासाठी राजी करतील, असं बोललं जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग