Uddhav Thackeray Vs Eknath Shinde: दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता शिवसेना व एकनाथ शिंदे गटानं आपापल्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदे गटानं दसरा मेळाव्याचा व्हिडिओ टीझरही शेअर केला आहे. त्यातून त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर दावा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेनं मेळाव्याच्या या टीझरमधील नेमकी त्रुटी पकडत एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून काल मेळाव्याचा व्हिडिओ टीझर शेअर करण्यात आला आहे. त्यात बाळासाहेबांचं हिंदुत्व जपण्याची ग्वाही देण्यात आली आहे. एक नेता, एक पक्ष, एक विचार… हे शिवसेनेचं घोषवाक्य त्यात समाविष्ट करतानाच 'एक लव्य आणि एक नाथ' या शब्दांची जोडही देण्यात आली आहे. आनंद दिघे यांचा फोटोही व्हिडिओमध्ये वापरण्यात आला आहे.
शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या टीझरवर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली आहे. ‘विद्यमान मुख्यमंत्री नवे नवे दिघे भक्त झालेत, असा टोला त्यांनी हाणला आहे. ‘नव्या दिघेभक्तांच्या दसरा मेळाव्याचा टीझर नुकताच पाहिला. एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ. सगळं कसं छान जमून आलंय, फक्त ‘एक निष्ठ’ हा महत्त्वाचा शब्द तेवढा राहिलाय, याकडं अचूक लक्ष वेधत, 'तसंही व्यावसायिक लोकांचं आणि निष्ठा शब्दाचं काही नातं असण्याचं कारण नाही, अशी बोचरी टीका अंधारे यांनी केली आहे. 'शिंदे गटाच्या निष्ठेबाबत आम्हाला फार भाष्यही करायचं नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
आमचा मेळावा विराट होईल असं शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे. त्याचीही सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. 'तुमच्याकडं वातानुकूलित बसेस, ५० खोक्याच्या मदतीनं सोडलेल्या ट्रेन, पंचतारांकित हॉटेलातलं जेवण सगळ्या सुविधा असतीलही, पण वंदनीय बाळासाहेबांचा विचार प्रमाण मानणारा आमचा शिवसैनिक आपल्या कष्टाची भाकरी खाऊन पायी चालत शिवतीर्थापर्यंत पोहोचेल आणि हा मेळावा गद्दारी विरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा ऐतिहासिक मेळावा असेल ज्याची साक्ष उभा महाराष्ट्र देईल, असं अंधारे यांनी ठणकावलं आहे.