मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Legacy of Phule Couple : सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुलेंचा वारसा अन् नवा वाद

Legacy of Phule Couple : सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुलेंचा वारसा अन् नवा वाद

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 10, 2022 05:06 PM IST

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यापासून महाराष्ट्रात गदारोळ सुरू आहे. यावरून महाविकास आघाडी आणि भाजपने परस्परविरोधी आरोप केल्याने हा वाद निर्माण झाला आहे. तर फुले दांपत्याचा देशासाठी वारसा काय आहे आणि हा वाद नेमका का सुरू झाला याबाबत सविस्तर माहिती घेऊयात.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र (social media)

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांना विविध स्तरातून अभिवादन केलं जात आहे. परंतु त्यांच्या यावेळच्या पुण्यतिथीला वादाची किनार आहे. कारण काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दुरदृश्य प्रणालीद्वारे तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे कार्यक्रमात उपस्थित होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. परंतु या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फुले व्यासपीठावरुन बोलताना फुले दांपत्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यामुळे आता नवीन राजकीय वादंग निर्माण झालं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

 

नेमका वाद काय?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुणे विद्यापीठात केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यात ते म्हणतात की 'कल्पना करा की सावित्रीबाई फुले यांचं लग्न वयाच्या 10 व्या वर्षी झालं होतं, तेव्हा त्यांचे पती म्हणजे 13 वर्षांचे होते तर 13 वर्षांचे मुलं-मुली लग्न केल्यानंतर काय विचार करत असतील?'. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी यावर आक्षेप घेत राज्यपाल कोश्यारी यांनी फुले दांपत्याचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

 

त्याचबरोबर राज्यपाल कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील आयोजित एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी 'जर समर्थ (समर्थ रामदास स्वामी) नसते तर शिवाजीला कुणी विचारलं असतं?', असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळेही महाविकास आघाडीने कोश्यारींवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप केला. यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोश्यारींवर टीका करत 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु या जिजाऊच होत्या', असा दावा केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे गुरु कोण? हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला.

 

अजित पवारांनी PM मोदींसमोर कोश्यारींना खडसावले?

 

मेट्रोच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले असता या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्यासमोर व्यासपीठावरुन बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले होते की 'मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होतायंत, ते वक्तव्य महाराष्ट्राला आणि कुठल्याही महाराष्ट्रातल्या व्यक्तीला पटणारी नाहीत, मान्यदेखील नाहीत'. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राज्यपाल कोश्यारी यांची तक्रार केली होती.

 

फुले दाम्पत्याचे योगदान काय?

 

महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दांपत्याचं महाराष्ट्रातल्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीत मोठं योगदान आहे. महिलांना शिक्षणाचा हक्क नाकारणाऱ्या व्यवस्थेत फुले दांपत्याने 1848 साली पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील पहिली 'मुलींची शाळा' चालवली होती. त्या शाळेमध्ये जात, धर्म, लिंग याचा भेद न करता सर्वांना प्रवेश देण्यात आला होता. जेव्हा त्यांनी हे सामाजिक कार्य सुरू केलं तेव्हा जोतिबा फुले यांचं वय 21 तर सावित्रीबाई यांचं वय 18 वर्ष इतकं होतं. त्यानंतर देशभरात सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणाचे जनक मानलं गेलं.

 

जोतीराव फुले यांनी मुलींची गर्भात हत्या होऊ नये म्हणून पुण्यात 1853 साली 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू केलं. त्यामध्ये गर्भवती महिलांची विशेष काळजी घेऊन त्याची प्रसूती केली जात असे. त्याचबरोबर जोतीरावांनी 1873 साली 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. ज्याद्वारे समाजसुधारणा करण्याचा मानस निर्धारित करण्यात आला होता. 

 

फुलेंच्या भिडे वाड्याची सद्यस्थिती काय?

पुण्यातला भिडेवाडा नेहमी वर्दळ असणाऱ्या पेठांच्या भागात आहे. परंतु भिडेवाड्याची अवस्था ही जीर्ण झाली आहे. त्याचं जतन झालेलं नाही तर तिथं कोणत्याही सुविधा नाहीत. वाड्यात फुले दांपत्याच्या पाऊलखुणा जरी असल्या तरी त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. त्यामुळं त्याचं जतन आणि संवर्धन व्हावं, अशी मागणी विविध पक्ष आणि संघटना करत आलेल्या आहेत. तरीदेखील पुणे महापालिका किंवा महाराष्ट्र सरकारने ही बाब गंभीरतेनं घेतलेली दिसत नाही.

 

 

IPL_Entry_Point