मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hindu Temple : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला; भिंतीवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा

Hindu Temple : ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये हिंदू मंदिरावर हल्ला; भिंतीवर लिहिल्या भारतविरोधी घोषणा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 23, 2023 12:37 PM IST

Melbourne Crime News : गेल्या महिन्याभरात ऑस्ट्रेलियातील मंदिरांवरील हा तिसरा हल्ला आहे. आरोपींनी मंदिरात तोडफोड करताना भारतविरोधी घोषणाबाजी केल्यामुळं खळबळ उडाली आहे.

melbourne mandir news today
melbourne mandir news today (HT)

Melbourne mandir news today : गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू मंदिरांवर सातत्यानं हल्ले केले जात आहे. गेल्या आठवड्यात बीएपीएस स्वामीनारायण मंदिरावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता अल्बर्ट पार्कमधील हिंदू मंदिरात तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली असून प्रार्थनास्थळांच्या सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपींनी हिंदू मंदिरांवर हल्ले करताना भारतविरोधी घोषणा दिल्या आहे. याशिवाय मंदिराच्या भिंतीवर भारताचा निषेध करणारा मजकूर लिहिला. त्यामुळं आता या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाण्याची मागणी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायानं केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील अल्बर्ट पार्क मंदिरात खालिस्तानी समर्थकांनी तोडफोड केली. मंदिरातील पुजाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी भारतविरोधी घोषणा दिल्या. अल्बर्ट पार्कातील हिंदू मंदिर हे भक्ती योग आंदोलनाचं केंद्र राहिलेलं आहे. हिंदू मंदिरावरील हल्ल्यामुळं आम्ही व्यथित झालो असून आरोपींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असं इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते भक्त दास यांनी म्हटलं आहे. हिंदू मंदिरांवर हल्ले करून खालिस्तानी समर्थक ऑस्ट्रेलियात द्वेष पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय समुदाय मोठ्या संख्येनं राहतो. यात व्यवसाय, शिक्षण आणि नोकरीसाठी ऑस्ट्रेलियात वास्तव्य करणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे.

यापूर्वी १२ जानेवारीला मेलबर्नमधील स्वामीनारायण मंदिरावर आरोपींनी भारतविरोधी घोषणा लिहिल्या होत्या. याशिवाय मंदिराला विद्रूप करण्याचाही प्रयत्न खालिस्तानी समर्थकांनी केला होता. त्यानंतर १७ जानेवारीला शिव विष्णू मंदिरावर अज्ञात आरोपींनी हल्ला केला होता. त्यातच आता अल्बर्ट पार्कमधील मंदिरावरही खालिस्तान समर्थकांकडून हल्ला करण्यात आल्यामुळं व्हिक्टोरिया पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

IPL_Entry_Point