Aurangzeb Graveyard : मुघलांचे अवशेष महाराष्ट्रात नको, औरंगजेबची कबर काढून टाका; शिंदे गटाची मागणी
Chhatrapati Sambhajinagar News : औरंगाबादचं नामांतर झाल्यानंतर आता औरंगजेबची कबर काढून टाकण्याची मागणी शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
Sanjay Shirsat On Aurangzeb Graveyard Khuldabad : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आल्यामुळं सध्या राजकीय वादंग पेटलेलं आहे. औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे. तर भाजप आणि शिंदे गटानं नामांतराच्या निर्णयावरून ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यानंतर आता औरंगजेबची खुलदाबादेतील कबर काढून टाकण्याची मागणी शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. त्यामुळं आता यावरून नवं राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, आम्हाला औरंगजेबाच्या कबरीचे अवशेष महाराष्ट्रात नको आहेत. त्यामुळं खुलदाबादेतील औरंगजेबाची कबर काढायला हवी, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार असल्याचंही आमदार शिरसाट यांनी म्हटलं आहे. औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यामुळं त्याचं सर्वात जास्त दुख: हे हैदराबादींना झालेलं आहे. त्यामुळं हे लोक उपोषणाच्या नावाखाली शहराला वेठीस धरण्याचं काम करत आहेत, असं म्हणत आमदार संजय शिरसाट यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका केली आहे. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं करणं हा औरंगजेबाविरोधातील मोठा लढा आहे. त्यात काही लोकांना वाईट वाटण्याचं कारण काय आहे?, तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात का?, असाही सवाल करत संजय शिरसाट यांनी एमआयएमवर हल्ला चढवला आहे.
एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबचे पोस्टर्स...
औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समर्थकांसह साखळी उपोषण सुरू केलं आहे. यावेळी आंदोलनात काही तरुणांनी औरंगजेबाचे पोस्टर्स झळकावले आहे, त्यावरून मोठा राजकीय वाद झाला होता. त्यानंतर आता शहरातील सिटी चौक पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.