Twitter Blocked Pakistan Government: भारताच्या मागणी नंतर ट्विटरने मोठी कारवाई करत पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात ब्लॉक केलं आहे. गेल्या सहा महिन्यातील ही दुसरी कारवाई आहे. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसीनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचं हे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक करण्यात आले आहे.
ट्विटरनं आपल्या पॉलिसीमध्ये अनेक बदल केले आहेत. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसीनुसार, भारताच्या कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचं हे ट्विटर हँडल भारतात ब्लॉक केले गेले आहे. जर न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी मागणी असेल तर त्यावरून अशा प्रकारची कारवाई करण्याचे अधिकार ट्विटरला आहे.
पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर गेल्यानंतर तिथे लिहिलंय की, भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचं भारतातील ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आलं आहे, असा मजकूर लिहिलेला दिसून येतो.
दरम्यान, ट्विटरने केलेली ही कारवाई फक्त भारतापूर्ती मर्यादित आहे. पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांमध्ये सक्रिय आहे. या प्रकरणी भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
या प्रकारची कारवाई ही गेल्यावर्षी देखील करण्यात आली होती. जून २०२२मध्ये ट्विटर इंडियानं भारतातील संयुक्त राष्ट्र, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावासांची अधिकृत ट्विटर अकाउंट गोठवली होती. या सोबतच भारतविरोधी खोटी माहिती पसरवणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनल आणि फेसबुक अकाउंट देखील बंद करण्यात आले होते.
दरम्यान, पाकिस्तानचे ट्विटर अकाउंटवर यापूर्वीही भारतात बंद करण्यात आले होते. जुलै २०२२ मध्ये, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर भारतात बंदी घातली होती. परंतु नंतर ती बंदी हटवण्यात आली. मात्र, आता पुन्हा ट्विटरने ही कारवाई केली आहे.