मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Imran Khan: पाकिस्तान हादरले! जाहीर सभेत गोळीबार, माजी पंतप्रधान इम्रान खान जखमी

Imran Khan: पाकिस्तान हादरले! जाहीर सभेत गोळीबार, माजी पंतप्रधान इम्रान खान जखमी

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 03, 2022 05:51 PM IST

Imran Khan injured in firing: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सभेत गोळीबार झाला असून त्यात इम्रान खान यांच्यासह अन्य काही नेते जखमी झाले आहेत.

Imran Khan
Imran Khan

Firing at Imran Khan's Rally: सततची सत्तांतरं व राजकीय राड्यांमुळं कायम खदखदत असणारं पाकिस्तान आज पुन्हा हादरलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जाहीर सभेत अज्ञातांनी गोळीबार केला असून त्यात इम्रान खान यांच्यासह चार जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

डॉन न्यूजनं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. लष्कराच्या दबावामुळं मागील वर्षी इम्रान खान यांना देशाची सत्ता सोडावी लागली होती. त्यानंतर इम्रान खान अधिकच आक्रमक झाले आहेत. नव्या सरकारविरोधात त्यांनी मोर्चे व आंदोलनांचा धडाका लावला आहे. शाहबाज शरीफ यांच्या सरकारविरोधात इम्रान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षानं लाहोर ते इस्लामाबाद असा 'लाँग मार्च' सुरू केला आहे. याच लाँग मार्च दरम्यान ते एका कंटेनर ट्रकवर उभे राहून जमावाला संबोधित करत होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्या दिशेनं गोळीबार केला. त्यात त्यांच्या उजव्या पायाला गोळी लागल्याचं स्थानिक मीडियानं म्हटलं आहे. त्यांचे अन्य काही सहकारीही गोळीबारात जखमी झाले आहेत. पंजाब प्रांतातील वजिराबाद येथील अल्लाह हो चौकाजवळ हा हल्ला झाला.

हल्ल्यानंतर इम्रान खान यांना कंटेनरमधून बाहेर काढण्यात आलं. त्यांच्या पायावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर बुलेट प्रूफ कारमध्ये नेऊन थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

थरकाप उडवणाऱ्या 'त्या' घटनेची आठवण

पाकिस्तानला रक्तरंजित राजकारण नवीन नाही. सत्तांतर होताना तिथं अनेकांना प्राण गमवावा लागल्याचा इतिहास आहे. अनेक नेत्यांना देश सोडून परागंदा व्हावं लागलं आहे. पुन्हा एकदा तेच सत्र सुरू झालं आहे. इम्रान खान यांच्यावरील गोळीबारामुळं माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्यावरील हल्ल्याच्या अंगावर काटा आणणाऱ्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. डिसेंबर २००७ मध्ये एका सभेत असताना भुत्तो यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग