पाकिस्तान सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर बंदी घातली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आल्याचं सरकारकडून अधिकृतपणे कोर्टात सांगण्यात आलं आहे. पाकिस्तानात निर्माण झालेली ‘गंभीर’ स्वरुपाची समस्या सोडविण्यासाठी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास ‘X’ या सोशल मीडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली असल्याचा आरोप पाकिस्तान सरकारने केला आहे.
पाकिस्तानात फेब्रुवारी महिन्यात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचा आरोप सध्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांच्या 'तहेरिक ए इन्साफ' या बंदी घातलेल्या पक्षातर्फे सार्वत्रिक निवडणुकीतील हेराफेरीचा निषेध करून पाकिस्तानात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येत होती. त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यापासून पाकिस्तानात सोशल मीडिया वापरकर्त्यांना 'X' या प्लॅटफॉर्मवर मजकूर आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात अडचणी येत आहेत. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने आज, बुधवारी न्यायालयात दिलेल्या लेखी निवेदनात ‘X’ वर घालण्यात आलेल्या बंदीचा उल्लेख केला आहे. ‘एक्स (पूर्वीचे ट्विटर) पाकिस्तान सरकारच्या कायदेशीर निर्देशांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याने आणि ‘X’ या प्लॅटफॉर्मच्या गैरवापराबद्दल चिंता दूर करण्यात अपयशी ठरल्याने बंदी घालण्याची आवश्यकता होती’, असं रॉयटर्सने या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.
दरम्यान, पाकिस्तान सरकारने एका आठवड्याच्या आत 'एक्स' पूर्ववत करावे, असे पाकिस्तानच्या उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या सिंध उच्च न्यायालयाने सरकारला बंदीचे पत्र मागे घेण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली असल्याची माहिती 'एक्स'वरील बंदीला आव्हान देणारे वकील मोईज जाफरी यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं.
पाकिस्तानात ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी देशभरात मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे केले होते. दरम्यान, मतदानाच्या दिवशी हेराफेरी करण्यात झाल्याची जाहीर कबुली एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिली होती. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) या पक्षाने देशभर निदर्शने करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) घालण्यात आलेल्या बंदीवर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तान आणि जगभरातील लोकांसाठी इंटरनेट प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावेत, अशी आमची इच्छा आहे, असं अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
संबंधित बातम्या