मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  MV Glory Ship : सुएझ कालव्यात पुन्हा महाकाय जहाज अडकलं; जलवाहतूक विस्कळीत झाल्यानं जगभरात खळबळ

MV Glory Ship : सुएझ कालव्यात पुन्हा महाकाय जहाज अडकलं; जलवाहतूक विस्कळीत झाल्यानं जगभरात खळबळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 09, 2023 02:18 PM IST

suez canal blockage : काही महिन्यांपूर्वी सुएझ कालव्यात मालवाहू जहाज अडकल्यानं अनेक आठवडे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता पुन्हा याच कालव्यात आणखी एक जहाज अडकल्याची माहिती समोर येत आहे.

mv glory cargo ship stuck in suez canal
mv glory cargo ship stuck in suez canal (HT)

mv glory cargo ship stuck in suez canal : युरोपातून येणारं एव्हरग्रीन नावाचं मालवाहू जहाज इजिप्तच्या सुएझ कालव्यात अडकल्यामुळं अनेक आठवडे जलवाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता एमव्ही ग्लोरी नावाचं महाकाय जहाज पुन्हा याच कालव्यात अडकल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. सुएझ कालव्यात वाहतुकीची सेवा देणाऱ्या एका कंपनीनं याबाबतचा खुलासा केला आहे. त्यामुळं आता सुएझ कालव्यात महाकाय जहाज अडकल्यानंतर प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं त्याला बाजूला काढण्याचं काम सुरू केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युरोपला आशिया आणि आफ्रिकेशी जोडणाऱ्या सुएझ कालव्यातील कांतारा परिसरात एमव्ही ग्लोरी नावाचं मालवाहू जहाज कालव्यात अचानक आडवं झालं आहे. त्यामुळं कालव्यातून आशिया आणि आफ्रिकेच्या दिशेनं जाणाऱ्या मालवाहू जहाजांचा मार्ग बंद झाला आहे. परिणामी अनेक देशांमध्ये मालवाहतूक करणारी महाकाय जहाजं कालव्यात अडकून पडली आहेत. त्यानंतर आता इजिप्तच्या सरकारनं कालव्यातील जलवाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केल्याची माहिती आहे.

उत्तर इजिप्तसह युरोपातून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळं सुएझ कालव्यातून प्रवास करणारं एमव्ही ग्लोरी हे जहाज एका बाजूला कलंडलं. त्यानंतरही हवेचा वेग जास्त असल्यानं त्याला नियोजित जलमार्गावर आणण्यात कॅप्टनला अपयश आलं आहे. या घटनेवर अद्याप इजिप्त सरकारकडून कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही. सुएझ कालव्याची रुंदी केवळ ३०० मीटर असल्यामुळं यातून मालवाहू जहाजांना मार्ग शोधणं फार कठीण होतं. यापूर्वी २०२१ साली एव्हरग्रीन नावाचं महाकाय जहाज तब्बल दोन आठवडे सुएझ कालव्यात अडकून पडलं होतं. त्यामुळं युरोप, आशियासह अनेक आफ्रिकन देशांना कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला होता.

IPL_Entry_Point