बेंगळुरू विमानतळावर तब्बल दहा अॅनाकोंडा सापाची तस्करी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. सुटकेसमध्ये पिवळ्या रंगाचे, दहा अॅनाकोंडा जातीचे साप भरून आणणाऱ्या एका तरुणाला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर अटक केली आहे. जप्त करण्यात आलले सर्व साप सुटकेसमध्ये जिवंत आढळले आहे. हा विमानप्रवासी साप घेऊन थायलंडची राजधानी बँकॉकहून बेंगळुरू विमानतळावर उतरला होता. प्रवाशाने त्याच्या चेक-इन सुटकेसमध्ये अॅनाकोंडा साप लपवून आणले होते, अशी माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रवाशाच्या सुटकेसची तपासणी केली असता सापांच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला. बेंगळुरू विमानतळावर कार्यरत कस्टम विभागाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पकडण्यात आलेल्या अॅनाकोंडा सापाचे फोटो शेअर केले आहेत. या प्रवाशावर वन्यजीवांची बेकायदेशीर तस्करी करण्याचे कलम लावण्यात आले आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी या प्रवाशाचे नाव मात्र अद्याप जाहीर केलेेले नाही.
‘बँकॉकहून येणाऱ्या विमानप्रवाशाच्या चेक-इन बॅगमध्ये लपवून ठेवलेल्या १० पिवळ्या रंगाच्या अॅनाकोंडाची तस्करी करण्याचा प्रयत्न झाला. बेंगळुरू विमानतळावर कार्यरत कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विमानप्रवाशाच्या बॅगेची झडती घेतली असता हे साप दिसून आले. त्यानंतर विमानप्रवाशाला अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वन्यजीवांची तस्करी खपवून घेतली जाणार नाही.’ #WildlifeProtection,' असं कस्टम विभागाने शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. १९६२ च्या कस्टम कायद्याअंतर्गत वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी नियमांत कठोर तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे.
अशाच एका घटनेत सप्टेंबर २०२३ मध्ये बेंगळुरू विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी बँकॉकहून आलेल्या एका विमानातून एका बॅगमधून तब्बल विविध जातीचे ७२ साप आणि सहा माकडं जप्त केली होती. या सापांमध्ये ५५ अजगर आणि १७ किंग कोब्रा जातीच्या सापांचा समावेश होता. यातील सर्व साप बॅगेच्या आत जिवंत आढळले होते. तर सहा कॅपुचिन जातीच्या माकडांचा प्रवासादरम्यान श्वास गुदमरून मृत्यू झाला होता. कस्टम कायदा १९६२च्या कलम ११० नुसार कस्टम अधिकाऱ्यांनी हे वन्यजीव जप्त केले आहेत.
संबंधित बातम्या