मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka polls 2023 : पवारांची कर्नाटकात ‘पॉवर’.. भाजपचे चार ते पाच आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार !

Karnataka polls 2023 : पवारांची कर्नाटकात ‘पॉवर’.. भाजपचे चार ते पाच आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार !

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 19, 2023 04:31 PM IST

Karnataka polls 2023 : भाजपचे ४-५ विद्यमान आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी केला आहे.

Sharad pawar
Sharad pawar

Karnataka assembly polls 2023 : महाराष्ट्रात राजकीय भूकंप होण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार असल्याचे बोलले जात असतानाच पक्षासाठी कर्नाटकमधून चांगली बातमी आली आहे. कर्नाटकमध्ये १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असून अनेक नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका लागला आहे. कर्नाटक भाजपला गळती लागली असून अनेक आजी-माजी मंत्री व आमदारांनी पक्ष सोडला आहे. आता भाजपचे ४-५ विद्यमान आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा कर्नाटक प्रदेशाध्यक्षांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस किमान ४० जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवणार आहे. त्याचबरोबर भाजपचे ४ ते ५ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असून ते निवडणुकीपूर्वी पक्षात प्रवेश करू शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष हरी आर यांनी केला आहे. हरी आर म्हणाले, आम्ही विधानसभा निवडणुकीत किमान ४० जागांवर लढणार आहोत. भाजपचे चार ते पाच विद्यमान आमदार पक्ष प्रवेशासाठी आमच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर बंगळुरूचे माजी महापौरही लवकरच आमच्या पक्षात सामील होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.

भाजपने कर्नाटक निवडणुकीसाठी गुजरात मॉडेल स्वीकारले असून ३० टक्के विद्यमान आमदार व मंत्र्यांचे तिकीट कापण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना व तरुणांना संधी देण्यात आली आहे. मात्र यामुळे नाराज झालेले वरिष्ठ नेते भाजपला राम राम ठोकून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यात उत्तर कर्नाटकातील सवदी यांना अथनी मतदारसंघातून तिकीट दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक बोलावली होती. यावेळी कर्नाटक निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा असलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे. आयोगाने राष्ट्रवादीला प्रादेशिक पक्षाचा दर्जा दिला आहे.

 

२०१८ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने १४ जागांवर निवडणूक लढवली होती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एकूण २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान होनार असून १३ मे रोजी मतमोजणी होईल.

IPL_Entry_Point