Indian railway news : भारतीय रेल्वेने प्रवाशांचा सोईसाठी आता नवी योजना सुरू केली आहे. आतापर्यंत आरक्षित डब्यांमधील प्रवाशांना जेवण मिळत होते. मात्र, आता जनरल डब्यात देखील प्रवाशांना स्वस्त दरात जेवण देण्याची सुविधा भारतीय रेल्वेने सुरू केली आहे. त्यामुळे आता जनरल डब्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.
भारतीय रेल्वेच्या अनारक्षित म्हणजेच जनरल डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या डब्यातून अनेक सामान्य नागरिक हे प्रवास करत असतात. या डब्यातील गर्दी पाहता बऱ्याचवेळा प्रवाशांना बाहेर रेल्वे स्थानकावर जाऊन जेवण घेणे शक्य नसते. तसेच रेल्वे स्थानकावरील जेवणाचे दर देखील जास्त असतात. त्यात चांगल्या दर्जाचे जेवण मिळेल याची देखील शाश्वती नसते त्यामुळे नेहमी दुर्लक्षित राहिलेल्या या डब्यातील प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने आता आरक्षित डब्यांप्रमाणेच अनारक्षित म्हणजेच जनरल डब्यातील प्रवाशांना कमी दरात जेवण उपलब्ध करून देणार आहेत.
मध्य रेल्वे, भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) च्या सहकार्याने प्रवाशांना, विशेषत: अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) स्वस्त दरात स्वच्छतापूर्ण अन्न आणि नाश्ता उपलब्ध करून देण्यासाठी ही नवी योजना सुरू करण्यात आली आहे.
उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन, भारतीय रेल्वेने अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही योजना सुरू केली. हे दर परवडण्यासारखे आहेत. मध्य रेल्वेने १०० स्थानकांवर प्रवाशांना स्वस्तात जेवण देण्याची सुविधा सुरू केली आहे. पुणे विभागात पुणे, मिरज, दौंड आणि साईनगर शिर्डी या स्थानकांवर प्रवाशांना ही सुविधा मिळू लागली आहे.
प्रवाशांना परवडणारे जेवण २० रुपयांत दिले जात आहे. याचवेळी इतर खाद्यपदार्थ ५० रुपयांत दिले जातील. हे जेवण आणि प्रवाशांना पिण्यासाठी पाणी फलाटावरील अनारक्षित डब्यांच्या जवळ असलेल्या काउंटरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या काउंटरवरून प्रवासी त्यांचे जेवण थेट खरेदी करू शकतात. त्यामुळे विक्रेत्यांना शोधण्याची किंवा स्थानकाच्या बाहेर जाण्याची प्रवाशांना गरज नाही.
मध्य रेल्वेमध्ये पुणे विभागात पुणे, मिरज, दौंड आणि साईनगर शिर्डी स्थानकांवर ही सुविधा सुरू झाली आहे. याचबरोबर मुंबई विभागात इगतपुरी, कर्जत स्थानके, भुसावळ विभागात मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव स्थानके, नागपूर विभागात नागपूर, वर्धा स्थानके, सोलापूर विभागात सोलापूर, वाडी, कुर्डुवाडी स्थानकांवर ही सुविधा सुरू झाली आहे.
गेल्या वर्षी सुमारे ५१ स्थानकांवर या सेवेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. चाचणीतील यशाच्या आधारावर, रेल्वेने कार्यक्रमाचा लक्षणीय विस्तार केला आहे, आता १०० हून अधिक स्थानकांवर आणि एकूण १५० काउंटरवर कार्यरत आहेत. भविष्यात आणखी स्थानकांचा समावेश करून या उपक्रमाचा आणखी विस्तार करण्याची योजना आहे.
संबंधित बातम्या