मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Noida Crime News : फक्त पाच रुपयांसाठी ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Noida Crime News : फक्त पाच रुपयांसाठी ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये हाणामारी; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 18, 2023 06:46 PM IST

Noida Crime News : फळांची खरेदी करताना किंमतीवरून ग्राहक आणि फळविक्रेत्यामध्ये शिवीगाळ झाली. त्यानंतर दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Noida Uttar Pradesh Viral Video
Noida Uttar Pradesh Viral Video (HT)

Noida Uttar Pradesh Viral Video : फळांची खरेदी करताना त्याच्या किंमतीवरून झालेल्या वादाचं रुपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात ही घटना घडली असून हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता फळविक्रेत्याला मारहाण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेच्या काही तासांच्या आतच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच नोएडातील एका सोसायटीत तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता ग्राहक आणि फळविक्रेत्यामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आल्यामुळं नोएडा शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित नावाचा तरुण नोएडातील अजय हरोला भाजी मार्केटमध्ये फळखरेदी करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्यानं फळविक्रेता असलेल्या अजयला सफरचंदाची किंमत विचारली. त्यावेळी अजयनं ९० रुपये किलोचा भाव सांगितला. परंतु अमितनं ८५ रुपये प्रतिकिलो सफरचंद देण्याची मागणी केली. याच कारणावरून अजय आणि अमितमध्ये वाद झाला. दोघांमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर अमितनं आपल्या साथीदारांच्या मदतीनं फळविक्रेता अजयला मारहाण करायला सुरुवात केली. अमित आणि त्याच्या साथीदारांनी फळविक्रेता अजयला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांड्यानं मारहाण केली. त्यावेळी भाजी मार्केटमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर येताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. परंतु तोपर्यंत दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झालेले होते.

हाणामारीत जखमी झालेल्या अजयला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पोलिसांनी व्हायरल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावरून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

IPL_Entry_Point