मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Refectory Meal : पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या; किळसवाण्या प्रकारानंतर भोजनगृह बंद

Refectory Meal : पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या; किळसवाण्या प्रकारानंतर भोजनगृह बंद

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 18, 2023 06:25 PM IST

SPPU Refectory Meal: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफॅक्ट्रीतील जेवणात अळ्या आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Refactory Meal In SPPU
Refactory Meal In SPPU (HT)

Savitribai Phule Pune University : पश्चिमेचं ऑक्सफर्ड अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या दर्जाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण आता रिफॅक्ट्रीतील जेवणात अळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यामुळं विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत रिफॅक्ट्री बंद पाडली आहे. विद्यापीठात जी-२० ची महत्त्वपूर्ण परिषद संपल्याच्या काही तासांनंतरच ही धक्कादायक घटना समोर आल्यामुळं पुण्यात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही अनेकदा विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघाल्याच्या घटना समोर आलेल्या होत्या. परंतु यंदाचं शैक्षणिक वर्ष संपत आलेलं असतानाच जेवणात पुन्हा अळ्या निघाल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी संदीप माने हा आज दुपारी मुख्य इमारतीलगत असलेल्या रिफॅक्ट्रीत जेवण करण्यासाठी गेला असता त्याच्या जेवणात अळ्या असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यावेळी त्यानं भोजनालयातील कर्मचाऱ्यांना याबाबत कळवलं. परंतु त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळं विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्मचाऱ्यांशी चर्चा करत भोजनालय बंद केलं आहे. याशिवाय विद्यापीठातील ज्या विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या निघाल्या आहेत, त्यांनी जेवणावर बहिष्कार टाकत मेसचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या जेवणात अळी निघण्याची ही तिसरी ते चौथी घटना आहे. एका बाजूला विद्यापीठ प्रशासनानं भरमसाठ दरवाढ केली असून दुसऱ्या बाजूला सातत्यानं निकृष्ट दर्जाचं जेवण विद्यार्थ्यांना दिलं जात आहे. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीनं संबंधित भोजनगृह चालकाच्या बदलीची आणि भोजनगृह समितीच्या स्थापनेची मागणी केली असल्याचं राहुल ससाणे यांनी सांगितलं आहे. या प्रकरणावर अद्याप विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

IPL_Entry_Point

विभाग