मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Congress President : पार्ट टाईम नाही, कॉंग्रेसला फुल टाईम अध्यक्ष पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण

Congress President : पार्ट टाईम नाही, कॉंग्रेसला फुल टाईम अध्यक्ष पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 24, 2022 01:59 PM IST

Congress President Election : अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी थेट सोनिया गांधीकडे फुल टाईम अध्यक्ष देण्याची मागणी केली आहे.

Prithviraj Chavan On Congress President Election 2022
Prithviraj Chavan On Congress President Election 2022 (HT)

Ex CM Prithviraj Chavan On Congress President Election 2022 : अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून कॉंग्रेसमधील अंतर्गद वाद चव्हाट्यावर आले आहेत. कारण आता राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाला पार्ट टाईम नाही तर फुल टाईम अध्यक्ष देण्याचा मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्षाच्या नव्या अध्यक्षाला सर्वांना भेटण्यासाठी भरपूर वेळ असायला हवा, त्याच्यावर दुसरी कोणतीही जबाबदारी द्यायला नको, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत G-२३ गटाकडून खासदार शशी थरुर आणि गांधी गटाकडून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं नाव जवळपास फायनल झाल्याची माहिती आहे. त्यामुळं आता याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळायला हवा ही आमची प्रमुख मागणी आहे. याशिवाय अध्यक्षपदाच्या निवडणुका पारदर्शीपणे पार पडायला हव्यात, अशीही मागणी त्यांनी शीर्ष नेत्यांकडे केली आहे. याशिवाय अशोक गेहलोत हे सध्या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर आहेत, त्यामुळं पदावर असतानाही ते अध्यक्षपद स्विकारत असतील तर त्याला आमचा विरोध आहे. आम्हाला हे बिलकूल चालणार नाही. आम्हाला पूर्णवेळ अध्यक्ष हवा आहे, असं म्हणत त्यांनी गेहलोत यांच्या उमेदवारीवर टीका केली आहे.

कॉंग्रेसच्या त्या ठरावावरही टीका...

मुंबई कॉंग्रेस कमिटीनं पक्षाच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींना पाठिंबा देण्यासाठी एक ठराव पास केला होता. त्याला पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध केला आहे. ते म्हणाले की, मुंबईत पक्षानं ठराव पास करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पक्षांतर्गत सर्व पदांवर निवडणुका व्हायला हव्यात. असे ठराव कोण पास करतंय?, असा सवाल करत त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर टीका केली आहे.

पक्षाचं अध्यक्षपद स्विकारून राहुल गांधी पूर्णवेळ काम करणार असतील, तर आम्हाला काहीही अडचण नसल्याचं चव्हाण म्हणाले. याशिवाय कॉंग्रेस पक्ष मोदींना हुकुमशहा म्हणतो, पण कॉंग्रेसही लोकशाही पद्धतीनं चालला पाहिजे ना. असले ठराव कोण करतंय हे मधुसुदन मिस्त्रींनी स्पष्ट करायला हवं, असं ते म्हणाले.

IPL_Entry_Point