मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BMC Mumbai : ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; टेंडरही काढलं, बीएमसीचा मोठा निर्णय

BMC Mumbai : ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी; टेंडरही काढलं, बीएमसीचा मोठा निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 24, 2022 12:56 PM IST

Gateway Of India Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध 'गेटवे ऑफ इंडिया'ला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करत असतात. त्यामुळं आता त्याच्या सुशोभिकरणासाठी बीएमसीनं निविदा काढली आहे.

Gateway Of India Beautification Project
Gateway Of India Beautification Project (Satish Bate/HT PHOTO)

Gateway Of India Beautification Project : मुंबईतील प्रसिद्ध 'गेटवे ऑफ इंडिया'च्या सुशोभिकरणाबाबत मुंबई महापालिकेनं मोठा निर्णय घेतला आहे. 'गेटवे ऑफ इंडिया' आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यासाठी बीएमसीनं १४ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली असून त्यासाठी आता कामाची निविदाही काढल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पामार्फत सध्याचं तिकीट काउंटर, सार्वजनिक शौचालयं आणि सिक्युरिटी चौकी पाडून त्याजागी नवीन लँडस्केप प्लाझा बांधण्यात येणार आहे.

'गेटवे ऑफ इंडिया' या हेरिटेजला पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात आणि हेरिटेजलगतची जागा मोकळी व्हावी, या उद्देशानं बीएमसीनं या प्रकल्पाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच या प्रकल्पासाठी मुंबई हेरिटेज कॉन्झर्व्हेशन कमिटीनं मंजुरी दिली होती. त्यानंतर आता या कामासाठी निविदा काढण्यात आली आहे.

याबाबत बीएमसीच्या एका अधिकाऱ्यानं माहिती देताना सांगितलं की, 'गेटवे ऑफ इंडिया' च्या आजूबाजूला पर्यटकांना फिरण्यासाठी मुबलक प्रमाणात जागा निर्माण व्हावी, या उद्देशानं या प्रकल्पाचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यासाठी गेटवे ऑफ इंडिया' परिसरातील विद्युत खांब काढून टाकण्यात येणार आहेत. याशिवाय संपूर्ण गेटवे ऑफ इंडिया परिसरात प्रकाश पडेल, अशी दिवे बसवण्यात येणार आहे. त्यामुळं परिसरात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्याही बाजूनं स्पष्ट दिसेल. या कामाची प्रत्यक्ष सुरुवात येत्या महिनाभरात होणार असल्याची माहिती आहे.

हेरिटेज स्ट्रक्चर आणि त्याच्या जवळचा १०० मीटरचा परिसर राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतो आणि बोटिंगचा परिसर मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि त्याच्या बाहेरील भाग महापालिकेच्या अंतर्गत येतो, त्यानंतर आता पुरातत्व खातं आणि महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या जागेवर हे सुशोभिकरणाचं काम करण्यात येणार आहे.

गेटवे ऑफ इंडियाच्या सुशोभिकरणाचं काम करताना तेथील भौतिक आणि पायाभूत सुविधांबद्दलही विचार केला जाणार आहे. याशिवाय हा प्रकल्प तयार करताना तेथील झाडांना कोणतीही इजा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असं बीएमसीकडून सांगण्यात आलं आहे.

WhatsApp channel