Rahul Gandhi News Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरील केलेल्या टिप्पणीमुळं काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात राहुल गांधी यांना तातडीनं जामीन मिळालेला असला तरी आता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधींची खासदारकी रद्द केली आहे. त्यामुळं आता आधीच संकटात सापडलेल्या काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. परंतु कोर्टानं दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधींवर झालेली कारवाई ही काही पहिलीच नाही. यापूर्वी देखील अनेक नेत्यांवर अशा पद्धतीनं कारवाई करण्यात आली होती. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांची देखील खासदारकी यापूर्वी रद्द करण्यात आली होती. यात कोणकोणत्या नेत्यांचा समावेश आहे, जाणून घेऊयात.
इंदिरा गांधी (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशातील अलाहाबाद हायकोर्टानं एका प्रकरणात तात्कालीन पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांना दोषी ठरवत त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. गांधी या रायबरेली मतदारसंघातून खासदार होत्या. कोर्टाच्या कारवाईमुळं इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदावर पाणी सोडावं लागलं होतं.
लालू प्रसाद यादव (बिहार)
कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळा प्रकरणात झारखंडमधील कोर्टानं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर ते बिहारच्या सारन लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
मोहम्मद फैजल (लक्षद्वीप)
लक्षद्वीपमध्ये एका राजकीय नेत्यावर जीवघेणा हल्ला केल्याच्या प्रकरणावरून केरळमधील कोर्टानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहम्मद फैजल यांना कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
यशवंतराव गडाख (महाराष्ट्र)
राष्ट्रवादीचे नेते यशवंतराव गडाख हे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. परंतु त्यांनी निवडणूक आयोगाला खोटी माहिती दिल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टानं गडाख यांना अपात्र ठरवलं होतं.
आझम खान (उत्तर प्रदेश)
उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री आझम खान यांना हेट स्पीच प्रकरणात कोर्टानं दोषी ठरवलं होतं. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. याशिवाय ते अनेक महिने तुरुंगात होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना जामीन मिळाला आहे.