मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  meghalaya govt : अमित शहा ज्यांना ‘भ्रष्टाचारी’ म्हणाले, त्याच पक्षासोबत भाजप मेघालयात सरकार बनवणार

meghalaya govt : अमित शहा ज्यांना ‘भ्रष्टाचारी’ म्हणाले, त्याच पक्षासोबत भाजप मेघालयात सरकार बनवणार

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Mar 06, 2023 06:28 PM IST

meghalaya govt formation : ईशान्येकडील मेघालयात सरकार स्थापनेसाठी स्थानिक एनपीपी पक्ष आणि भारतीय जनता पार्टीदरम्यान एकमत झालं असून येत्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

Meghalaya Govt Formation
Meghalaya Govt Formation (PTI)

ईशान्येकडील मेघालयात सरकार स्थापनेसाठी स्थानिक एनपीपी पक्ष आणि भारतीय जनता पार्टीदरम्यान एकमत झालं असून येत्या बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी एनपीपीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर जाहीर आरोप केले होते. आता त्याच एनपीपीसोबत सरकार स्थापन करणाऱ्या भाजपवर कॉंग्रेसने सडकून टीका केली आहे.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मेघालयात येऊन एनपीपी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे बेछुट आरोप केले होते. मेघालयात भाजपला ५९ जागा लढवून फक्त दोन जागांवर विजय मिळवता आला. आता सत्ता स्थापनेसाठी एनपीपीसोबत हातमिळवणी करणे म्हणजे मेघालयातील सर्वसामान्य जनतेला मूर्ख बनविण्यासारखे आहे. निवडणूक जाहीरनाम्यातून भाजपने मतदारांना दिलेलं वचन संपूर्ण खोटं होतं, असाच याचा अर्थ आहे’ असा आरोप मेघालय कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विन्सेंट पाला यांनी केला आहे. भाजपने मेघालयमध्ये प्रादेशिक पक्षाला धमकावल्याचा आरोपही पाला यांनी केला.

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनीही भाजपवर टीका केली. ‘भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मेघालयात जाऊन निवडणूक प्रचारादरम्यान एनपीपी सरकारमध्ये पूर्वी झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची जाहीर मागणी केली होती. कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, उत्तर प्रदेशातील भ्रष्टाचार प्रकरणांबद्दल अशाच पद्धतीने नाटक रचण्यात आले होते. ज्या राजकीय पक्षावर भाजप भ्रष्टाचाराचे आरोप करतं त्यांच्यासोबत सत्तेसाठी हातमिळवणी करत आहे’ असा आरोप सुप्रिया श्रीनेत यांनी केला.

मेघालय विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेत्यांनी एनपीपीच्या नेत्यांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचा व्हिडिओ यावेळी पत्रकार परिषदेत दाखविण्यात आला.

एकूण ५९ आमदार संख्या असलेल्या मेघालय विधानसभेत एनपीपीचे २६, भाजपचे दोन आमदार निवडून आले आहेत. एनपीपी आघाडीला छोट्या आणि अपक्ष आमदारांच्या युनायटेड डेमोक्रेटिक आघाडी आणि पीपल्स डेमोक्रेटिक आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर संगमा यांना एकूण ४५ आमदारांचा पाठिंबा प्राप्त झाला आहे. भाजपच्या निवडून आलेल्या दोन्ही आमदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी प्रदेश भाजपकडून करण्यात आली आहे.

IPL_Entry_Point