Smita Thackeray : तुम्ही बाळासाहेबांचे वारस, मग आम्ही कोण?; स्मिता ठाकरेंचा उद्धव यांना सवाल
Smit Thackeray questions Uddhav : बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारसदार मीच आहे, असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना स्मिता ठाकरे यांनी सवाल केला आहे.
रत्नागिरीतील खेड इथं रविवारी झालेल्या सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली आहे. ती चोरण्याचा कोणालाही नाही. आम्ही शिवसेना असाच उल्लेख करणार असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं होतं. उद्धव यांच्या या टीकेला स्मिता ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'तुम्ही बाळासाहेबांचे वारस आहात, मग आम्ही कोण आहोत,' असा सवाल स्मिता यांनी केला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला आणि शहीद जवानांच्या शूर पत्नींच्या सत्काराच्या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी नाव न घेता टीका केली व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं. आम्हाला अशाच प्रकारचा मुख्यमंत्री हवा होता, असं त्या म्हणाल्या.
'एकनाथ शिंदे यांना आम्ही अनेक वर्षांपासून ओळखतो. साहेबांचे शिलेदार म्हणूनच ते ओळखले जायचे. मागच्या वर्षभरात त्यांनी केलेला प्रवास हा साधा प्रवास नव्हता. त्यामागे काही अथक परिश्रम आहेत, त्यामुळंच ते आज या पदावर आहेत, असं स्मिता ठाकरे म्हणाल्या.
स्मिता ठाकरे या बाळासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव जयदेव ठाकरे यांच्या पत्नी होत्या. कालांतरानं त्यांनी घटस्फोट घेतला. सध्या त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सक्रिय आहेत.
एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक
‘केवळ मी वारसदार आहे, वारसदार आहे, असं म्हणून काही होत नाही. त्यासाठी तळागाळात काम करावं लागतं. लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात आणि सोडवाव्याही लागतात. एकनाथ शिंदे यांनी हे केलं आहे आणि करत आहेत, असं स्मिता ठाकरे म्हणाल्या. 'एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक असून महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. ते सतत काम करत असतात. वेळ पाहून कामं करत नाहीत. फक्त तीन तास झोपतात. त्याचा दिवस खूप लवकर सुरू होतो आणि उशिरा संपतो. त्यांच्या कामानं वेग घेतला आहे, त्यामुळंच ते सर्वांचे आवडते मुख्यमंत्री बनले आहेत. महिला व लहान मुलांसाठी देखील ते काम करत आहेत, असं स्मिता ठाकरे म्हणाल्या.