मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Morbi Constituency : पूल दुर्घटनेमुळं गाजलेल्या मोरबीत भाजप आघाडीवर; काँग्रेसला धक्का

Morbi Constituency : पूल दुर्घटनेमुळं गाजलेल्या मोरबीत भाजप आघाडीवर; काँग्रेसला धक्का

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 08, 2022 11:24 AM IST

Morbi Constituency Result : गुजरातमधील मोरबीत झुलता पूल नदीत कोसळल्यानं तब्बल १४१ लोकांचा मृत्यू झाला होता.

Morbi Gujarat Constituency Result
Morbi Gujarat Constituency Result (HT)

Morbi Gujarat Constituency Result : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू आहे. विधानसभेच्या १८२ जागांपैकी १५२ जागांवर भाजपनं आघाडी घेत सलग सातव्यांदा बहुमतानं सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे. विधानसभेच्या ऐन निवडणुकीपूर्वी मोरबीत झुलता पूल कोसळ्यानं तब्बल १४१ लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मोरबी जिल्ह्यात भाजपविरोधात विरोधकांनी वातावरण तापवलं होतं. परंतु आता मोरबीतही भाजपनं मोठी आघाडी घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं या दुर्घटनेमुळं जनतेतील रोष कमी करण्यात यश आल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोरबीत भाजपचे उमेदवार कांतिलाल अमृतिया हे आघाडीवर असून काँग्रेसचे उमेदवार जयंतीलाल जेराजभाई पटेल हे पिछाडीवर आहेत. याशिवाय आम आदमी पार्टीचे उमेदवार पंकज कांतीलाल यांनीही पहिल्यांदाच निवडणूक लढवून चांगली मतं मिळवली आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, मोरबीत भाजपचे उमेदवार कांतिलाल अमृतिया हे मोठ्या मताधिक्यानं आघाडीवर असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

कोण आहेत कांतिलाल अमृतिया?

मोरबीत झुलता पूल कोसळल्यानंतर कांतिलाल अमृतिया यांनी सर्वात आधी घटनास्थळी पोहचून मदत व बचावकार्य सुरू केलं होतं. त्यामुळं त्यांना मिळत असलेला पाठिंबा पाहून भाजपनं विद्यमान आमदाराचं तिकीट कापून कांतिलाल अमृतिया यांना मोरबीतून उमेदवारी दिली होती. कांतीलाल हे १९९५ पासून आरएसएसचे स्वयंसेवक असून ते मोदी-शहांचे निकटवर्तीय मानले जातात.

भाजपनं तब्बल ४० विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं...

गुजरातमध्ये ज्या आमदारांच्या विरोधात जनतेचा रोष आहे, त्या आमदारांचं तिकीट कापून भाजपनं नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. त्यात ४० विद्यमान आमदारांचा समावेश आहे. त्यामुळं जनतेचा विरोध असतानाही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यानंच भाजपला मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे. गुजरातमध्ये गेल्या २७ वर्षांपासून भाजपची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळं आता मोदी केंद्रात गेल्यानंतरही गुजरातमध्ये भाजपनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे.

IPL_Entry_Point