मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bihar Politics: नितीश कुमार भाजपवर इतके नाराज का? ही आहेत कारणं

Bihar Politics: नितीश कुमार भाजपवर इतके नाराज का? ही आहेत कारणं

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Aug 08, 2022 12:13 PM IST

Nitish Kumar upset with BJP: बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून नितीश कुमार भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे.

Narendra Modi - Nitish Kumar
Narendra Modi - Nitish Kumar

Nitish Kumar upset with BJP: शिवसेनेतील बंडामुळं महाराष्ट्रातील सत्ता ताब्यात घेण्यात यशस्वी झालेल्या भारतीय जनता पक्षाला बिहारमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संयुक्त जनता दलाचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री भाजपवर प्रचंड नाराज असून ते भाजपची साथ सोडण्याची शक्यता आहे. नितीशकुमार यांनी काँग्रेसच्या माध्यमातून पर्यायाची चाचपणी सुरू केली असून राष्ट्रीय जनता दलही सक्रिय झाला आहे. त्यामुळं भाजपची सत्ता जाण्याची शक्यता आहे. 

कधी काळी भाजपसोबत असलेला नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलानं काही वर्षांपूर्वी राज्यातील कट्टर प्रतिस्पर्धी लालू प्रसाद यादव यांच्याशी जुळवून घेऊन निवडणूक लढली होती. यात दोन्ही पक्षांच्या महाआघाडीचा विजय झाला होता. मात्र, कालांतरानं मतभेद झाल्यामुळं नितीश कुमार यांनी भाजपशी पुन्हा घरोबा केला. भाजपशी घरोबा करून पुन्हा निवडणूक लढलेल्या नितीश कुमार यांना निवडणुकीत झटका बसला. भाजपला जेडीयू पेक्षा जास्त जागा मिळाल्या. त्यानंतरही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद मिळालं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून ते नाराज आहेत. त्यातूनच ते वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार नाराज का?

  • बिहार विधानसभेच्या अध्यक्षपदावरून विजयकुमार सिन्हा यांना हटवलं जावं अशी नितीश कुमार यांची मागणी आहे. सिन्हा हे सरकारच्याच विरोधात बोलून राज्यघटनेचं उल्लंघन करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळात जेडीयूच्या एकाच नेत्याला जागा देण्याची तयारी भाजपनं दाखवली आहे. त्यामुळंही नितीश नाराज आहेत. त्यामुळंच बिहारच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी जेडीयूच्या आठ जणांना स्थान देऊन भाजपसाठी एक मंत्रीपद रिक्त ठेवलं आहे.
  • राज्यात आणि केंद्रात एकाच वेळी निवडणूक घेण्यास नितीश यांचा विरोध आहे. 'एक देश एक निवडणूक' असा भाजपचा प्रस्ताव आहे. त्यास विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. नितीश कुमार यांनी देखील विरोधकांच्या सुरात सूर मिसळला आहे.
  • बिहारचं मंत्रिमंडळात भाजपच्या आमदारांना स्थान देताना आपलं मत विचारात घेतलं जावं असं नितीश यांचं म्हणणं आहे. मात्र, अमित शहा हे त्यांच्या जवळच्या लोकांना मंत्रिमंडळात स्थान देतात. नितीश यांचे उत्तम संबंध असलेल्या सुशीलकुमार मोदी यांना राज्याबाहेरची जबाबदारी दिली आहे.
  • पक्षाला डावलून भाजप जेडीयूच्या काही नेत्यांशी केंद्रातील मंत्रिपदासाठी चर्चा करते हे देखील नितीश कुमार यांना आवडलेलं नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी न होण्याचा निर्णय आम्ही २०१९ सालीच घेतला होता. केवळ प्रतिकात्मक सहभाग आम्हाला मान्य नाही, असं जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन (लल्लन) सिंह यांनी म्हटलं आहे.

वाचा: भाजपवर नाराज नितीश कुमार यांनी साधला सोनिया गांधींशी संपर्क

IPL_Entry_Point

विभाग